Kolhapur Football : बेशिस्त फुटबॉल संघ, खेळाडूंना दंडात्मक कारवाईचा डोस
आजवर 64 हजार रुपयांचा दंड वसूल करत संघांना शिस्त पाळण्याचा इशाराही दिला आहे.
By : संग्राम काटकर
कोल्हापूर : कोल्हापुरी फुटबॉलमधील संघ, खेळाडूंना शिस्तीचा डोस देण्यासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने (केएसए) दंडात्मक कारवाईचे इंजेक्शन हाती घेतले आहे. या इंजेक्शनमधून फुटबॉल संघाचे ऑफिशियल्स, संघ समर्थकांचीही सुटका नाही असा पवित्रा केएसएने घेतला आहे. जो कोणी शिस्तीचा भंग करेल त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, हे केएसएने गेल्या पाच फुटबॉल स्पर्धांमध्ये आकारलेल्या दंडातूनच दाखवून दिले आहे. आजवर 64 हजार रुपयांचा दंड वसूल करत संघांना शिस्त पाळण्याचा इशाराही दिला आहे.
मागील दीड दशकांपूर्वीच्या काळात कोल्हापुरी फुटबॉलकडे सर्वजण आत्मीयतेने पाहत होते. संघांमधील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून लोकांची मनेही जिंकली आहेत. जुन्या काळातील खेळाडूंनी केलेला उत्कृष्ट खेळ हजारो फुटबॉलप्रेमींच्या आजही चांगला लक्षात आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून तर कोल्हापुरी फुटबॉल भारताबरोबरच जगाच्या पटलावर येऊन ठेपला आहे. हेही फुटबॉल खेळाडूंनी केलेल्या उत्तम खेळाचेच द्योतक आहे.
गेल्या काही वर्षांपासून तर राष्ट्रीय संघांना स्थानिक फुटबॉल स्पर्धेत स्थान दिले जावे अशी मागणी फुटबॉलप्रेमी करत आहेत. तसेच मोठमोठ्या फुटबॉ ल स्पर्धा आयोजनासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असा सूरही उमटत असतानाच फुटबॉ लला बेशिस्तीचे ग्रहण लागले आहे. गेल्या तीन वर्षात फुटबॉल सामन्यांदरम्यान संघ समर्थकांनी केलेल्या हुल्लडबाजीने हिमनगाचे टोक गाठले आहे. खेळाडूही अखिलाडूवृत्ती दाखवत मारामारीचे प्रकारे करताहेत.
संघ समर्थकांची हुल्लडबाजी आणि खेळाडूंच्या मारामारीच्या प्रकाराला फुटबॉलप्रेमी वैतागून गेले आहेत. हुल्लडबाजी वाढली तर फुटबॉल बंद पडायला वेळ लागणार नाही असेही उघडपणे बोलत आहेत. खेळाडू व संघांना शिस्त लागण्यासाठी कडक नियम आवश्यक असल्याची चर्चाही सर्वत्र घुमत आहे. या सगळ्याचा सारासार विचार करूनच काढण्यास फुटबॉल संघ, खेळाडू, संघांचे ऑफिशियल्स व समर्थकांना शिस्तीची आठवण करून देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शिस्त न पाळणाऱ्यांसाठी दंडात्मक कारवाईचे इंजेक्शनही हाती घेतले आहे.
फुटबॉल हंगामाच्या सुऊवातील झालेल्या शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉ ल स्पर्धेत बेशिस्त दाखवलेल्या 7 संघांकडून 26 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच गेल्या 4 स्पर्धांमधूनही बेशिस्तीच्या कारणावऊन संघांकडून 38 हजार रुपयांचा दंड घेतला आहे. फुटबॉल सामन्यावेळी मैदानात संघ ऑफिशिअल्सकडून मोबाईल घेऊन जाणे, सामना खेळण्यास बंदी असूनही खेळाडूने मैदानात जाणे, फुटबॉल सामन्यात सहा येलो अथवा रेडकार्ड खेळाडूंनी घेणे,
सामन्याच्या फोर्थ रेफ्रीकडून तपासणी करून न घेताच संघांनी मैदानात उतरणे, सूचना देऊनही खेळाडूंनी बेशिस्त वर्तन करणे, रेडकार्डची कारवाई होऊनही खेळाडू ड्रेसिंगमध्ये न जाता मैदानाबाहेर थांबणे या कारणांनी दंड वसूल घेतला आहे. दंडात्मक कारवाईमुळे संघांमध्ये सुधारणा होईल असे वाटत होते. परंतु खेळाडूंनी केएसएची नियमावलीचा भंग करुन कोल्हापुरी फुटबॉललाच गालबोट लावले आहे. केएसएनेही आक्रमक पवित्रा घेत नियम,
खिळाडूवृत्ती आणि चांगले वर्तन पायदळी तुडवणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत नितीन साळोखे व पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाच्या ओंकार मोरेला चालू हंगाम संपेपर्यंत सामने खेळण्यास मनाई केली आहे. तसेच एका सामन्यात मारामारी करणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाच्या ओंकार लायकर व संयुक्त जुना बुधवार पेठ संघाच्या सनवीरसिंगला दोन सामने खेळण्यास अटकाव केला. पुढील सामन्यांमध्ये जर गैरवर्तन आढळल्यास अधिकची कारवाई केली जाईल, अशी समज दिली आहे. आता दंडात्मक कारवाई दरवर्षीच्या फुटबॉल हंगामात करण्यात येणार असल्याचे केएसएकडून सांगण्यात येत आहे.
केएसएचे दंडात्मक कारवाईसाठी असे आहेत नियम
नियम क्रमांक 9 : सामन्यासाठी फोर्थ रेफ्रीने केलेल्या पाहणीनंतरच संघाने मैदानात उतरावे. तसे न केल्यास संघाला 2 हजार रुपयांचा दंड. नियम क्रमांक 13 जी : सामना खेळण्यासाठी बंदी असूनही खेळाडू मैदानात आल्यास संबंधित खेळाडूच्या संघाचा 1 हजार रुपयांचा दंड.
नियम क्रमांक 13 एच : सामन्यात दसमुसळा खेळ करून अथवा मारामारी करून सहापेक्षा जास्त खेळाडूंनी येलो किंवा रेड कार्ड मिळवल्यास 5 हजार रुपये दंड
नियम क्रमांक 14 : सामन्यावेळी मैदानात खेळाडू अथवा संघांच्या ऑफिशिअन्सने मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळ बाळगू नये. तसे आढळल्यास 3 हजार रुपयांचा दंड.
नाईलाजास्तव दंडात्मक कारवाई करावी लागते
"राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये शिस्तीला महत्व आहे. ले लक्षात घेऊन आणि गेल्या काही वर्षांपासून स्पर्धांमध्ये घडलेल्या हुल्लडबाजीच्या प्रकारांना डोळ्यासमोर केएसएनेही कोल्हापुरातील संघ व खेळाडूंना शिस्त पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जाते. शिस्त पाळली जाईल, अशी नियमावली तयार कऊन ती संघांना दिली जाते. परंतू संघ, खेळाडूंचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव केएसएला दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलावे लागले आहे. जो संघ, खेळाडू, संघ समर्थक, संघांचे ऑफिशिअल्स शिस्त व नियम पाळणार नाहीत, त्यांना दंड अटळ आहे."
- माणिक मंडलिक (सचिव : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन)
केएसएचा पवित्रा
- विविध संघांकडून गेल्या पाच स्पर्धांमधून 68 हजार ऊपयांचा दंड वसूल
- आता दरवर्षीच्या फुटबॉल हंगामात दंडात्मक कारवाई होणार