Kolhapur Football: फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी; समर्थक एकमेकांत भिडले
दोन्ही गटाच्या समर्थकांनी अक्षरश: ऐकमेकांच्या अंगावर धावून जात बॉटल फेकून, फ्री स्टाईल हाणामारी केली
कोल्हापूर : क्रिकेटवेड्या जगात कोल्हापूरांना आणि कोल्हापूरला फुटबॉलवेडे असं बोल जाते. मात्र मागील काही वर्षांत कोल्हापुरात फुटबॉलच्या खेळावरून वाद सुरु आहेत. या वादाच्या प्रसंगांमुळे कोल्हापूरचे नाव मलिन होत आहे. सध्या कोल्हापुरात अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. कोल्हापूरकर इतर स्पर्धांप्रमाणे या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु काल शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळच्या सामन्यादरम्यान प्रसंगानंतर पुन्हा एकदा वादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या सामन्या दरम्यान समर्थकांमध्ये प्रेक्षक गॅलरीत फ्रीस्टाईल हाणामारी झाली. सामना संपल्यानंतरही स्टेडियमच्या बाहेर जोरदार राडा झाला. यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून समर्थकांना पांगवले. कोल्हापुरात सध्या फुटबॉलचा हंगाम सुरू असून शाहू स्टेडियम येथे अटल चषक फुटबॉल सामने सुरु आहेत. पाटाकडील तालीम मंडळाने या सामन्याचे आयोजन केले आहे. इतक्या नेटक्या आयोजनाला गालबोट लागेल असे कृत्य दोन्ही सामन्यांच्या समर्थकांतून घडले आहे.
शिवाजी तरूण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण-बंदरे, सिद्धेश साळोखे, दर्शन पाटील यांनी पूर्वाधात 3-0 गोलनी वेताळमाळवर आघाडी मिळवली. उत्तरार्धात मात्र वेताळमाळची चांगलीच दमछाक झाली. यातूनच वेताळमाळ आणि शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांमध्ये शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली.
प्रेक्षक गॅलरीत दोन्ही गटाच्या समर्थकांनी अक्षरश: ऐकमेकांच्या अंगावर धावून जात बॉटल फेकून, फ्री स्टाईल हाणामारी केली. दरम्यान, स्पर्धा संयोजकांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. मात्र संपूर्ण वेळेत शिवाजी संघानं 3-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर गॅलरीतील वाद पुन्हा एकदा स्टेडियमच्या बाहेर उफाळला. सामना संपताच स्टेडियमच्या बाहेर दोन्ही संघाच्या 40 ते 50 समर्थकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात पुन्हा अरेरावी केली. यामुळे परिसरात काही काळ गोंधळ राहिला.
यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्यास सुरुवात केली आणि गर्दीला पांगवले. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत फुटबॉल स्पर्धा आणि इर्ष्येवरुन समर्थक आणि खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात पार पडलेल्या एका सामन्यात खेळाडूंमध्ये गोंधळ झाला. गोंधळानंतर काही खेळाडूंना फुटबॉल खेळण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र तरीदेखील ठराविक खेळाडू आणि प्रेक्षकांमुळे फुटबॉल आणि कोल्हापूरचं नाव मलिन होत आहे. यामुळे केएसएने आता कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूरकरांकडून होत आहे.