नहीं किसी से कम.... PTM चे 4 स्पर्धा जिंकून फुटबॉल हंगामावर वर्चस्व, 5 लाखांचे मानकरी
चारही स्पर्धांमधून 5 लाख रुपयांचे बक्षीसही आपल्या खात्यात जमा केले
By : संग्राम काटकर
कोल्हापूर : गेली सहा सामने छत्रपती शाहू स्टेडियममध्ये गाजत राहिलेल्या फुटबॉल हंगामात नही किसी से कम....पीटीएम हे आपले घोषवाक्य दर्जेदार खेळाच्या जोरावर सिद्ध करुन दाखवत पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाने तब्बल चार स्पर्धा जिंकल्या आहे. जिंकलेल्या या चारही स्पर्धांमधून 5 लाख रुपयांचे बक्षीसही आपल्या खात्यात जमा केले आहे.
कोल्हापुरी फुटबॉल विश्वातील 16 संघांच्या तुलनेत गोलकिपर, डिफेन्स, हाफ व फॉरवर्ड या चारही पातळींवरील खेळाडूंची मोट बांधून पाटाकडील 'अ' संघाच्या केलेल्या संघ बांधणीचेच हे फलीत आहे. संघात अंशीद अली, ऋषिकेश मेथे-पाटील, निवृत्ती पवनोजी हे तीन स्कोरर खेळाडू असून त्यांच्यात ऐनवेळी विरुद्ध संघावर गोल करण्याची धमक आहे. ही धमक त्यांनी दाखवून देत पाटाकडीलला अनेक सामनेही जिंकून दिले आहेत.
इतकेच नव्हे तर पाटाकडील संघाची बचावफळी ही एखाद्या भिंतीसारखी मैदानात उभी राहून विरुद्ध संघांच्या चाली परतवून लावत आहे. जमेची बाजू म्हणजे पाटाकडीलचा संघ विरुद्ध संघाला हलक्यात घेत नाही. शिवाय उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना खेळण्यासाठी पाटाकडीलचा संघ रणनिती घेऊनच मैदानात येतो. संघाचे ऑफिशियल्सकडून सामन्याचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध कशा पद्धतीने खेळला पाहिजे याची सुचना खेळाडूंना देत असतात.
खेळाडूही मिळणाऱ्या सुचनांनुसारच मैदानात खेळ करुन सामने जिंकतात. पाटाकडीलच्या संघाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे स्पर्धेच्या प्रत्येक अंतिम सामन्यात विरुद्ध संघांला जिंकण्याची संधी दिलेली नाही. या सगळ्या कारणांमुळेच पाटाकडीलने फुटबॉल हंगामात ताकतवर संघ म्हणून आपली प्रतिमा तयार करतानाच चार स्पर्धा जिंकून नही किसी से कम....पीटीएम हे आपले घोषवाक्य सत्यात उतरवले आहे.
पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाने जिंकलेली बक्षीसे
- शाहू छत्रपती केएसए (लीग) वरिष्ट गट फुटबॉल स्पर्धा : 1 लाख रुपये
- सतेज चषक फुटबॉल स्पर्धा : 2 लाख रुपये
- उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा : 1 लाख रुपये
- तोडकर संजिवनी चषक फुटबॉल स्पर्धा : 1 लाख रुपये
पाटाकडील पहिले विजेतेपद...
फेब्रुवारी महिन्यात तब्बल 20 हजाराहून अधिक फुटबॉलप्रेमीच्या उपस्थितीत झालेल्या रोमांचकारी सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाने शिवाजी तरुण मंडळावर 1-0 गोलने विजय मिळवतानाच 15 गुणांची कमाई करत शाहू छत्रपती केएसए (लीग) वरिष्ट गट फुटबॉल स्पर्धेची चॅम्पियनशीप पटकावली.
सामन्याच्या उत्तरार्धात ऋषिकेश मेथे-पाटीलने शिवाजी मंडळावर हेडद्वारे केलेला सुरेख गोल पाटाकडीलला चॅम्पियन मिळवून देण्यासाठी कामी आला. पाटाकडीलने सामना जिंकताच समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. 13 गुणांवर राहिलेल्या शिवाजी तरुण मंडळाला उपविजेतेपद मिळाले.
पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघातील खेळाडूंची नावे :
विशाल नारायणपुरे, राजीव मिरीयाला (दोघे गोलकीपर), ऋषिकेश मेथे-पाटील, प्रथमेश हेरेकर, अक्षय पायमल, यश देवणे, ऋतुराज संकपाळ, जय कामत, प्रतिक बदामे, संदेश कासार, नबी खान, अंशीद अली, रोहित पवार, अरबाज पेंढारी, रोहित देसाई, यशराज कांबळे, पृथ्वीराज थोरात. संघ व्यवस्थापक-धनंजय यादव, सहायक व्यवस्थापक-ऊपेश सुर्वे, प्रशिक्षक-सैफ हकीम.
पाटाकडीलचे सलग दुसरे विजेतेपद...
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी पाटाकडील तालीम मंडळ अ सं व खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला होता. यात पाटाकडीलने खंडोबाचा 4-2 गोलफरकाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले होते. फुटबॉल हंगामातील पाटाकडीलचे हे सलग दुसरे अजिंक्यपद ठरले. नही किसीसे कम...पीटीएम...असे म्हणत पाटाकडीलच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. खंडोबा मंडळाच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ करत फुटबाल शौकीनांची मने जिंकली होती.
पाटाकडीलची अजिंक्यपदाची हॅटट्रीक...
उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाने शिवाजी तरुण मंडळाला 2-0 गोलने पराभूत करत अजिंक्यपद पटकावले. या अजिंक्यपदाच्या रूपाने पाटाकडीलची फुटबॉल हंगामात स्पर्धा अजिंक्यपद मिळवण्याची हॅटट्रीक झाली. शिवाजी मंडळानेही पाटाकडीलला जोरदार टक्कर देत सामन्यात चुरस आणली होती.
पाटाकडीलचा अजिंक्यपदाचा चौकार...
तोडकर संजिवनी चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाने खंडोबा तालीम मंडळाचा सडनडेथमध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकावले. या अजिंक्यपदाच्या रूपाने पाटाकडीलने अजिंक्यपद जिंकण्याचा चौकार लागवला आहे. पाटाकडीलनेही भलेही स्पर्धा जिंकली असली तर खंडोबा मंडळाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आता फुटबॉल हंगामात कसे खेळावे लागेल, हे फुटबॉल शौकिनांना दाखवून दिले आहे.
शिवाजी मंडळाचे पिछेहाट...
पाटाकडीलच्या तोडीस तोड असलेल्या शिवाजी तऊण मंडळाने 2022 च्या हंगामात 4, 2023 च्या हंगामात 3 तर गतवर्षीच्या 2 स्पर्धा जिंकून कोल्हापूरी फुटबॉल विश्वात वर्चस्व सिद्ध केले होते. परंतू यंदाच्या फुटबॉल हंगामात शिवाजी मंडळाला खराब फॉर्ममुळे हाराकीरीला सामोरे जावे लागले आहे.
शिवाय एकही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवता आलेले नाही. शाहू छत्रपती केएसए (लीग) वरिष्ट गट फुटबॉल स्पर्धेची चॅम्पियनशीप मिळवण्याची चालून आलेली संधीचा शिवाजी मंडळाने गमावली होती. उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मारलेली धडक हीच एकमेव शिवाजी मंडळाची जमेची बाजू ठरली आहे.
खंडोबा तालीम मंडळाने जिंकला चंद्रकांत चषक...
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संयम आणि जिंकण्याची जिद्द दाखवून खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा 4-0 गोलने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. खंडोबाला अजिंक्यपदाचा सरताज मिळवून देण्यासाठी 2 गोल करणारा अमीन खजिर हा सामन्याचा खरा हिरो ठरला होता. जुना बुधवार पेठ संघाने खंडोबा तालीमला जोरदार टक्कर देत आम्ही स्पर्धा जिंकण्यालायक झालो आहोत हे सर्वांना दिले होते.
जुना बुधवारचे पहिले वहिले विजेते...
गेल्या आठ वर्षांपासून कोल्हापुरी फुटबॉल विश्वात टिकून राहत संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने आपले आव्हान निर्माण केले होते. परंतू स्पर्धा जिंकण्यात यश मिळत नव्हते. मात्र यंदाच्या फुटबॉल हंगामात आम्ही एकतरी स्पर्धा जिंकणार हे जुना बुधवारने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर दाखवून द्यायला सुरुवात केलीच होती.
बढ्या संघांना पराभूत करत आपला दरारा निर्माण केला. मागील अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तर जुना बुधवारने बलाढ्या खंडोबा तालीम मंडळाला 3-1 गोलफरकाने पारभूत करत अजिंक्यपद पटकावले. तब्बल आठ वर्षाच्या संघर्षानंतर जुन्या बुधवारचे हे पहिले वहिले विजेतेपद ठरले आहे.