बिद्रीत आढळला दुर्मिळ फुरसे जातीचा साप !
सरवडे प्रतिनिधी
रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिह्यामध्ये आढळणारा दुर्मिळ असा समजला जाणारा भारतातील सर्वाधिक विषारी समजला जाणारा फुरसे जातीचा साप बिद्री परिसरामध्ये पहिल्यांदाच आढळून आला. सर्पमित्र सयाजी चौगले यांनी अतिशय धाडसाने व सावधानतेने हा साप पकडला.
बिद्री(ता. कागल ) येथे घराच्या भराव्यासाठी मुरूम आणत असताना त्या मुरमा मधून हा साप बाहेर पडला. सर्पमित्र सयाजी चौगले यांनी या सापाला बघितल्यानंतर तो अत्यंत विषारी आणि दुर्मिळ फुरसे साप असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला पकडून दाजीपूरच्या जंगलात सोडून देण्यात आले.
‘फुरसे सापाची लांबी दोन ते अडीच फूट असते. हा साप राखाडी कलरचा असतो. त्याच्या अंगावरती काळे,पांढरे व तपकिरी रंगाचे पट्टे असतात. त्याच्या डोक्यावरती बाणासारखा आकार असतो. डोळ्याच्या बाहुली मध्ये उभी रेष असते. हा साप माणसांना सावध करण्यासाठी शरीर घासून कर्कश आवाज करतो. भारतातील प्रमुख चार विषारी सापापैकी हा एक साप आहे.