वारणेवर कोल्हापूरचा तर कोयनेवर सातारचा वरचष्मा : सांगलीकरांची पाण्यासाठी कोंडी
ऐन उन्हाळ्यात धरणांच्या पाण्यावरून सांगलीकर वेठीस, सांगली पाटबंधारे कार्यालय बनले राजकारणाचा अड्डा
सांगली प्रतिनिधी
कोयना धरणातून हक्काच्या पाण्यासाठी सातारा पालकमंत्र्यांना मिनतवाऱ्या कराव्या लागत असल्याचे चित्र असतानाच आता वारणेतून पाणी देण्यासाठी मे पर्यंतचा आराखडा पाठवा, तर सलग पाणी मिळणार नाही अशा स्पष्ट सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. त्यामुळे कोयना आणि वारणेच्या पाण्यावर राजकीय हस्तक्षेप वाढला असतानाच सांगलीला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली पाटबंधारे कार्यालय केवळ टेंडर मॅनेज करणे आणि राजकीय कुरघोड्या यांचे केंद्र बनले आहे.
दुष्काळ आणि पाणी प्रश्नावर सोमवारी सांगलीत माजीमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत आ. कदम, आ. सावंत आणि विशाल पाटील यांनी पाणी प्रश्नावरून राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. पाण्यासाठी शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात अडवणूक सुरू आहे. अधिकारी पैसे भरून घेतात आणि पाण्यासाठी खासदार तसेच पालकमंत्र्यांची भेट घ्या, असे सांगतात. असा गंभीर आरोप करण्यात आला. मुंबईत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी अथवा अन्य कोणीही आमदार, खासदार उपस्थित नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सांगलीत काँग्रेसचा मोर्चा सुरू असताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वारणा धरण कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. या बैठकीस ऑनलाईन हजर झालेल्या सांगली पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना मे पर्यंत पाण्याचे नियोजन द्या. अन्यथा म्हैसाळ योजनेसाठी सलग पाणी सोडण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. वारणा धरणात सांगली जिल्ह्यासाठी 11.58 टेमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 7.03 टीएमसी पाणी आतापर्यंत देण्यात आले आहे. शिल्लक राहिलेले 4.58 टीएमसी पाणी कधी आणि कसे पाहिजे याचा आराखडा द्या. आता सलग म्हैसाळ योजनेसाठी पाणी दिल्यास येत्या 45 दिवसांत सांगलीच्या वाट्याचे पाणी संपेल. त्यामुळे म्हैसाळ योजनेचा विसर्ग कमी करण्याची सुचना करण्यात आली. परंतु विसर्ग कमी केल्यास म्हैसाळ योजनेचे पंप चालत नाहीत. जतपर्यंत पाणी पोहोचू शकणार नाही. अशी भूमिका सांगली पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी मांडली. त्यावर सलग पाणी सोडल्यास सांगलीसाठी राखीव असलेले पाणी एप्रिलमध्येच पाणी सांपल्यास मे महिन्यात सांगलीसाठी पाणी देणार नाही. मे मध्ये जादा पाणी मागणार नाही, असे लेखी द्या अशा सुचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहेत.
कोयना धरणाच्या इतिहासात सांगलीकरांना प्रथमच कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. ऑगस्टपासून पाचवेळा कृष्णानदी कोरडी पडली. पाटबंधारे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्या कागदी घोड्यांना फारसा अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेसाठी पुरेसे पाणी सोडा पाण्यासाठी राजकारण करू नका, असे इशारे आणि विनंत्याही झाल्या. पण कोयनेच्या पाण्यावर राजकारण सुरूच आहे. तरीही सांगलीकर लोकप्रतिनिधींना यासाठी वेळच नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या धामधुमीत आहेत. तर जनता पाण्यासाठी त्रासली आहे.
सांगली पाटबंधारे बनले राजकारणाचा अड्डा
कोल्हापूर आणि सातारा पालकमंत्री पाण्यासाठी आक्रमक झाले असतानाच सांगलीचे पाटबंधारे कार्यालय राजकीय अ•ा बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांचा कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांसमोर पंचनामा केला. केवळ टेंडर मॅनेज करून देणे टक्केवारीवर हात मारणे इतकेच काम पाटबंधारेचे वरिष्ठ अधिकारी करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. सत्ताधारी नेते सांगतील त्याच गावांना पाणी सोडण्याचे राजकारण अधिकारी करत असल्याची भावना निर्माण होऊ लागल्याने दुष्काळी भागातील जनतेकडून सांगली पाटबंधारेच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. सामान्य शेतकऱ्यांना वरिष्ठ अधिकारी दिवसभर भेटही देत नसल्याने उद्रेक होण्यापुर्वीच अधिकाऱ्यांनी शहाणे व्हावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.