चंदगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.राज्याची तिजोरी माझ्याकडे असून लोकांच्या करातून जमलेला पैसा सत्कारणी लावण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. चंदगड तालुक्याला निसर्गाचे वरदान असून पर्यटनाच्या दृष्टीने या भागाच्या विकासाला मोठी संधी आहे. गोव्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग लवकरात लवकर मार्गी लावण्यास वचनबद्ध असून जे बोलते ते करतो, हा माझा स्वभाव आहे. जे काम करतो ते स्वच्छ, साफ आणि निर्मळ करतो. कोणाची भीडभाड ठेवत नाही. म्हणूनच पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, असे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. स्व. नरसिंगराव पाटील रेसिडेन्सी क्लबचे भूमिपूजन, छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले,चंदगड तालुक्याच्या विकासात स्व. नरसिंगराव पाटील यांनी मोठे योगदान दिले असून त्यांचे वारसदार राजेश पाटील यांनीही विकासाचा वसा पुढे चालवला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची त्यांना चांगली साथ आहे. आमचा तर भक्कम पाठिंबाच आहे. इथली माणसं गोड आहेत. चंदगडची बोलीभाषा समृद्ध असून या बोलीभाषेने मराठीच्या शब्द भांडारात भर घातली आहे. गोवा,कोकण, कर्नाटकची संस्कृती इथे नांदताना दिसते. त्याचा प्रभाव इथल्या भाषेवर आहे. माणसं कष्टकरी असून ऊस, चांगल्या फॅटचे दूध, उत्तम प्रतीची काजू इथल्या माणसाने निर्माण केली आहे. या भागाला बळ देण्याचे काम राजेश पाटील करीत असून त्यांना तुम्ही ताकद द्या. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. नरेंद्र मोदींना तिस्रयांदा पंतप्रधान करायचे आहे. सध्या आर्थिक आघाडीत भारत जगात पाचव्या क्रमांकावर असून तिस्रया क्रमांकावर म्हणजेच पाच टिलीयमची वाटचाल करायची आहे आणि आम्हाला महाराष्ट्र एका ट्रिलियन पर्यंत पोहोचवायचा आहे.
स्थानिक प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, राजेश पाटलांनी सुचविल्याप्रमाणे तातडीने किटवडे येथील धरणासाठीचा सर्वे होईल. काजू व्यवसायिकांना अडीच टक्के ऐवजी 5 टक्के जीएसटी परतावा मिळेल. नगरपंचायत कार्यक्षेत्रात रस्ते बांधणी व अन्य विकास कामांसाठी दहा कोटी दिले जातील. येत्या 19 फेब्रुवारी पूर्वी चंदगड येथे उभारलेल्या आश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याला शासकीय परवानगी दिली जाईल. आचारसंहिता लागण्यापूर्वी पन्नास हजारांचे शेतक्रयांना प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. वर्षानुवर्षे या भागात मी येतोय.कधी आमदार, कधी खासदार, तर कधी मंत्री म्हणून आलो. गेल्या वर्षी जानेवारीत विरोधी पक्षनेता म्हणून आलो. आज उपमुख्यमंत्री म्हणून आलोय. पुढच्या वेळेस कोणत्या भूमिकेत तुम्ही सत्कार करता, याची मलाच उत्सुकता आहे.
स्वागत चंदगडच्या नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी करून अजित पवार यांनी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर दिलेल्या विकास निधीबाबत कृतज्ञता व्यक्त केली. आमदार राजेश पाटील यांनी केल्या 40 वर्षात जे घडले नाही ते गेल्या साडेचार वर्षात झाले असून 850 कोटींचा निधी आणता आला. पुढच्या सहा महिन्यात किमान दीडशे कोटी आणून हजार कोटीचा टप्पा पूर्ण करण्यात अजित दादांचे सहकार्य लाभणार आहे. दादांच्या प्रयत्नाने 20 बेडचे टामा केअर आणि 50 बेडचे सरकारी हॉस्पिटल मिळाले आहे. काजूचे बोर्ड मिळाले आहे. बेळगाव वेंगुर्ले रस्ता हायब्रीड अन्युटीमधून मिळणार असल्याचेही सांगितले. सीमा भागातील साहित्य संमेलनाना प्रत्येकी पाच लाखाचे अनुदान मिळावे,अशी मागणी त्यांनी केली. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी चंदगडच्या बोली भाषेचे विशेष कौतुक करून या भाषेला गोडवा असल्याचे सांगितले. नीयतीच्या मनात जे असते, तसेच घडत असते. येण्राया काळात राजेश पाटील विकास कामांचा हजार कोटींचा टप्पा पार करतील. शिवरायांच्या 365 किल्ल्यांपैकी 4 किल्ले चंदगड तालुक्यात आहेत. त्यांच्या संवर्धनात राज्य सरकार अग्रेसर राहील,असे सांगितले. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजेश पाटील हा तरुण सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी झटणारा आहे. लोकाभिमुख नेतृत्व आहे. त्याच्या मागे आम्ही हिमालयासारखे उभे आहोत. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, याचा निकाल लागला असून लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, हे स्पष्ट झालेले आहे.
चंदगडच्या धर्मवीर संभाजी चौकातून ढोल ताशाच्या निनादात अजित पवार, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश पाटील, प्राची काणेकर यांची उघड्या जीप मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाईपर्यंत या जीपवर फुलांच्या पाकळ्यांचा मुसळधार पाऊस पाडण्यात आला. चंदगड तालुक्याच्यावतीने अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर खासदार संजय मंडलिक, ए. वाय. पाटील, दयानंद काणेकर, भिकू गावडे, परशराम पाटील, प्रवीण वाटंगी, अभयराव देसाई, श्री. असुरलेकर, तानाजी गडकरी, फिरोज मुल्ला यांच्यासह नगरसेवक, तालुका संघाचे संचालक आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मायाप्पा पाटील आणि संजय गावडे यांनी केले. आभार शिवानंद हुंबरवाडी यांनी मानले.