पीककर्ज वसुलीत कोल्हापूर लयभारी
धीरज बरगे,कोल्हापूर
Kolhapur Crop Loan : राज्यात एकीकडे पीककर्ज थकबाकीची टक्केवारी वाढत असताना कोल्हापूर मात्र पीककर्ज वसुलीत लयभारी ठरत आहे. जिल्हा बँकेकडून वितरीत करण्यात आलेल्या एकूण पीक कर्जापैकी 90 टक्के वसुली झाली आहे. 30 जुलै अखेर शेतकऱ्यांकडून 2069 कोटी 88 लाख इतक्या कर्जाची मागणी केली होती. यापैकी 1898 कोटी 94 लाख इतकी वसुली केली असून 210 कोटी 93 लाख इतकी थकबाकी राहिली आहे.
शेतीप्रधान जिल्हा असलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात पीककर्जाचा पुरवठा केला जातो. पीक कर्ज वितरणात जिल्हा बँक राज्यात अव्वल आहे. त्याचबरोबर पीककर्ज वसुलीतही जिल्हा बँक आघाडीवर आहे. जिल्हय़ात सर्वाधिक क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड केली जाते. ऊसाची तोडणी झाल्यानंतर बिल विकास सेवा सोसायटय़ामंध्ये जमा होऊन येथून पीककर्जाची वसुली करुन उर्वरीत बिल संबंधित शेतकऱयाला दिले जाते. यामुळे जिल्हय़ात पीककर्ज थकीत पडण्याचे प्रमाण केवळ 10 टक्के आहे.
पीककर्जाची 90 टक्के वसुली
जिल्हय़ातील शेतकऱयांकडून अल्पमुदत पीक कर्जाची सर्वाधिक उचल केली जाते. जिल्हा बँकेकडून 1932 कोटी 71 लाख रुपये इतके कर्ज वितरीत करण्यात आले आहे. यापैकी 1749 कोटी 22 लाख इतके कर्ज वसुल झाले आहे. तर 183 कोटी 48 लाख इतकी थकबाकी राहिली आहे. त्यानुसार जिल्हा बँकेकडून पीककर्जाची 90 टक्के वसुली झाली आहे.
पीककर्ज वाटपातही जिल्हा बँक अव्वल
जिल्हय़ातील 2 लाख 90 हजार शेतकरी जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करतात. त्यामुळे वसुलीसह पीककर्ज वाटपातही जिल्हा बँक राज्यात अव्वल आहे. प्रतिवर्षी उद्दीष्टापेक्षा अधिक पीककर्जाचे वाटप जिल्हा बँकेच्या माध्यमातून होते. यंदाच्या 2022-23 वर्षातही जिल्हा बँकेने 110 टक्के पीक कर्जाचे वितरण केले आहे.
पीककर्जाचे बिनव्याजी वितरण
शेतकऱयांना बिनव्याजी पीककर्जाचे वितरण करण्याचे धोरण जिल्हा बँकेचे आहे. त्यानुसार 5 लाखापर्यंतचे कर्जाचा पुरवठा जिल्हा बँक बिनव्याजी करते. त्यामुळे शेतकऱयांकडून पीककर्जाला प्रतिसाद मिळत आहे. नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांची संख्याही अधिक आहे.
संस्थांनी सुलभ योजनेत सहभागी व्हावे
जिल्हा बँकेशी 1900 विकास सेवा संस्था संलग्न आहेत. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱयांची कर्जपुरवठा केला जातो. यापैकी आठशे संस्थांची वसुली शंभर टक्के आहे. अशा संस्थांचा समावेश जिल्हा बँक सुलभ योजनेत करते. या योजनेच्या माध्यमातून पीककर्जाचे वितरण व वसुली करणे सहज शक्य होते. त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी सुलभ योजनेत सहभागी होण्यचा प्रयत्न करावा.
- डॉ. ए. बी. माने सीईओ, जिल्हा बँक.
शेती कर्जाचा प्रकार कर्जाची मागणी वसुली थकबाकी
अल्प मुदत 193271.29 174922.89 183480.40
मध्यम मुदत 1436.61 177.65 1258.96
दिर्घ मुदत 2030.87 1551.94 478.93
एकूण शेती कर्ज 196738.77 176652.48 20086.29
बिगर शेती 10249.42 9241.86 1007.56
एकूण 206988.19 185894.34 21093.85