निर्जनस्थळी जोडप्यांना लुटणाऱ्या चौघांना अटक; दोन गुन्हे उघडकीस, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई, कुमार गायकवाड मर्डरमधून जामिनावर सुटल्यानंतर लुटमारीच्या घटना, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चौघांना जेरबंद करुन त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल
कोल्हापूर प्रतिनिधी
कुमार गायकवाडच्या खूनातून जामिनावर सुटल्यानंतर निर्जनस्थळी बोलत बसलेल्या जोडप्यांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघा सराईत गुंडांसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. त्यांचेकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून तीन दुचाकी, मोबाईल व पाच तोळे सोन्याचे दागिने, चाकु असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
संशयित आकाश उर्फ राज अरविंद शेंडेकर (वय 20, रा. पाचगाव, ता. करवीर), आकाश उर्फ माया दिपक घस्ते (वय 20, रा. तामगांव, ता. करवीर) हे राजेंद्रनगर येथील कुमार गायकवाड याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयीत आहेत. यांच्यासह अथर्व उर्फ मवाली कृष्णात पाटील (वय 20, रा. म्हाळुंगे तर्फ बोरगाव, ता. करवीर), सौरभ उर्फ एस. पी. शिवाजी पाटील (वय 20, रा. सुभाषनगर) अशा चौघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 1 नोव्हेंबर रोजी फिर्यादी हे आपले मैत्रीणीसह शाहु टोलनाक्याजवळील वैभव सोसायटीचे पाठीमागील उंच टेकडीवर त्यांचे कारमधून फिरण्यास गेले होते. याठिकाणी दोघे बोलत बसले असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात चार तरुण आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मैत्रीणीस दमदाटी करुन चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील बोटातील दोन अंगठ्या घेवून पसार झाले. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी आणखी एक फिर्यादी कारमधून मैत्रीणीसह उजळाईवाडी येथील मसोबा मंदीराच्या पाठिमागील टेकडीवर गेले असता फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवून सोन्याची चेन व रोकड घेवून चौघेजण पसार झाले होते. या दोनही घटनांची नोंद गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात झाली होती. या दोनही घटनांची गंभीर दखल घेवून पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी तत्काळ लुटमारीच्या घटनांच्या छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार सागर माने, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, सुशिल पाटील यांच्या पथकाने शोध घेतला असता हे दोन्ही गुन्हे खुनाच्या गुह्यातील जामीनावर बाहेर असलेले आकाश उर्फ माया घस्ते व आदर्श शेंडेकर यांनी साथीदारांच्या मदतीने केल्याचे चौकशीमध्ये पुढे आले. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुह्यांची कबुली दिली. संशयितांना गोकुळ शिरगाव पोलीसांच्या ताब्यात दिले असून पुढिल तपास सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत.
जामिनावर सुटल्यानंतर प्रताप
संशयित आकाश उर्फ राज अरविंद शेंडेकर, आकाश उर्फ माया दिपक घस्ते हे राजेंद्रनगर येथील कुमार गायकवाड याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयीत आहेत. हे दोघेही एक महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले आहेत. यानंतर या दोघांनी लुटमारीच्या घटना सुरु केल्या. निर्जनस्थळी बसलेल्या जोडप्यांना हेरुन त्यांना लुटण्याचे उद्योग त्यांनी सुरु केले. अखेर या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले.
तपासाचे आव्हान
चौघेही संशयीत निर्जनस्थळी अंधारात बसणाऱ्या जोडप्यांना हेरत हेते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सिसीटीव्ही फुटेज नव्हते. यामुळे पोलिसांसमोर या गुह्यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर होते. मात्र खबऱ्यांचे नेटवर्क वापरुन पोलिसांनी या दोनही आव्हानात्मक गुह्यांचा छडा लावला.