वसाहतीतील दुकानाची भिंत फोडून ६० लाखांचा मुद्देमाल लंपास!
पुलाची शिरोली / वार्ताहर
शिरोली औद्योगिक वसाहतीतील दुकानाची भिंत फोडून ६० लाखांचा मुद्देमात अज्ञात चोरट्यानी लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.या बाबतची फिर्याद सागर पंडितराव निकम वय वर्षे ३९, रा. कावडे गल्ली, कसबा बावडा यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत घटनास्थळ व शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन( स्मँक)या संस्थेच्या "आयटीआय" च्या इमारतीमध्ये शॉप नंबर एक मध्ये सागर निकम यांचे नेक्सस कटिंग सोल्युशन डिस्ट्रीब्यूशन नावाची फर्म आहे. या दुकानातून औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सिएनसी, व्हिएमसी, एचएमसी व अन्य मशिनला लागणारे स्पेअर पार्ट्स पुरवले जातात. रविवारी सायंकाळी ६ विजता सागर निकम हे दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी औद्योगिक वसाहतीला सुट्टी असल्यामुळे दुकान बंद होते. मंगळवारी अविनाश पाटील हा कर्मचारी दुकान उघडण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता आले .पाटील यांनी दरवाजाचे कुलूप काढून दुकानात प्रवेश केला. यावेळी अत्यंत अडगळीच्या ठिकाणची पाठीमागील भिंत कटर व लोखंडी वस्तूच्या सहाय्याने पाडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पाटीलयांनी सागर निकम यांना सांगितली. निकम हे तत्काळ घटनास्थळी आले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी व कपाट उचकटून दुकानातील सुमारे साठ लाख रुपयांच्या वस्तूंची (पार्ट्स) चोरी झाली असल्याचे निकम यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांना कळवले. त्यानंतर शिरोली पोलिस व श्वानपथक , ठसे तज्ञ घटनास्थळी आले होते. त्यांनी पहाणी करुन पंचनामा केला. तसेच या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण ज्या ठिकाणी भिंत पाडून चोरी झाली तेथील कॅमेरे बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामध्ये कार्बाईड इन्सर्टस् नग २७७१२ किंमत ४६ लाख ५४ हजार ५२७ रुपये, कटर्स् नग ४३८ किंमत १० लाख ८२१ रुपये, ड्रिल्स् नग १२३ किंमत ३ लाख ६७ हजार ९२५ रुपये. असा एकूण ६० लाख ३ हजार २९३ रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.
याबाबतची फिर्याद सागर निकम यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी दिली. सपोनि पंकज गिरी यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. तसेच त्यांनी या चोरट्यांना शोधण्यासाठी एह पथक कार्यरत केले आहे.