कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करा! अमल महाडिकांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची भुरळ पर्यटकांनाही पडत असते, त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरवर्षी कोल्हापूर हाउसफुल होताना दिसते.
पण कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब रस्ते आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे या रस्त्यांची देखभाल करणे महानगरपालिकेला शक्य होत नाही. परिणामी कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते खड्डेमय बनले आहेत. या रस्त्यांवरून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे.
पर्यटक आणि भाविकांची कोल्हापुरात होणारी वाढती गर्दी लक्षात घेता कोल्हापुरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत घ्यावेत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये शिये फाटा ते कसबा बावडा ते ताराराणी पुतळा रस्ता, तावडे हॉटेल ते ताराराणी पुतळा रस्ता, फुलेवाडी चौक ते महानगरपालिका, वाशी नाका ते महापालिका, शिवाजी पूल ते महापालिका,उजळाईवाडी ते ताराराणी पुतळा,सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ आणि उचगाव ते टेंबलाई नाका चौक या रस्त्यांचा समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर या रस्त्यांची अवस्था सुधारेल आणि कोल्हापूर महानगरपालिकेवरील बोजा कमी होऊन भाविक, पर्यटक आणि कोल्हापूरच्या नागरिकांची सोय होईल असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मा.नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम उपस्थित होते.