Circuit Bench Kolhapur: कोल्हापूरचे सर्किट बेंच असेल पाच न्यायमूर्तींचे
न्यायमूर्तींचे एक डिव्हिजन बेंच तसेच 1 न्यायमूर्तींचे 3 बेंच असणार आहेत
By : आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सोमवार, 18 ऑगस्टपासून नियमित सुरु होत आहे. 2 न्यायमूर्तींचे एक डिव्हिजन बेंच तसेच 1 न्यायमूर्तींचे 3 बेंच असणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूरसह सहा जिह्यातील असणारे सुमारे 80 हजार खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग होणार आहेत.
यामुळे सहा जिह्यातील वकील आणि पक्षकारांना स्वस्त आणि जलद गतीने न्याय मिळण्यास मदत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर केल्याची घोषणा शुक्रवारी राजपत्राद्वारे करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी राज्यपालांच्या सहमतीने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली.
यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिह्यातील वकील आणि पक्षकारांच्या 43 वर्षांच्या लढ्यास यश आले. यानंतर कोल्हापूरसह सहा जिह्यांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. कोल्हापुरात सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे सहा जिह्यातील वकील, पक्षकारांचा वेळ, पैसा आणि श्रम यामध्ये बचत होणार आहे.
याचबरोबर त्यांना जलद न्याय मिळण्यासही मदत होणार आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) समोरील जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दोन हेरिटेज इमारतींचे केवळ नूतनीकरण करण्यात आले आहे. तेथील नवीन इमारतीमध्ये 4 कोर्ट रुम उभारल्या आहेत.
एक कोर्ट रुम याच परिसरातील वकीलांच्या रुममध्ये तयार केली आहे. १८ ऑगस्टपासून सर्किट बेंचचे काम सुरु होणार असून ते नियमित स्वरुपात सुरु राहणार आहे. २ न्यायमूर्तीचे एक डिव्हिजन बेंच, प्रत्येकी १ न्यायमूर्तीचे ३ बेंच कार्यरत असणार आहेत. सोबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाप्रमाणेच सर्किट बेंचचेही विधी सेवा प्राधिकरण स्वतंत्र पद्धतीने कार्यरत असणार आहे. लोकअदालतही घेण्यात येणार आहे. याचसोबत रजिस्टार जनरलही असणार आहेत.
ऑनलाईन अॅडव्होकेट कोडची गरज
कोल्हापुरातील वकीलांना सर्किट बेंचमध्ये कोणत्याही नवीन नोंदणीची गरज नसणार आहे. त्यांना केवळ ऑनलाईन खटले दाखल करण्यासाठी नवीन अॅ डव्होकेट कोड जनरेट करावा लागणार आहे. याचसोबत मुंबईतील वकीलही कोल्हापुरात खटले लढू शकणार आहेत. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील खटले सर्किट बेंचकडे वर्ग झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्यातील वकील आपल्या पक्षकारांचे खटले लढू शकणार आहेत. त्यांना मुंबई उच्च वकीलांची एनओसी घ्यावी लागणार न्यायालयात लढणाऱ्या नाही.
सहा जिल्ह्यातील खटल्यांची यादी तयार
सहा जिल्ह्यातील जवळपास ८० हजार खटले मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहेत. याची यादी उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडून तयार करण्यात आली असून, हे सर्व खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग करण्यात येणार आहेत. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
१५० हून अधिक कर्मचारी कोल्हापुरात सर्किट बेंचसाठी
१५० हून अधिक कर्मचारी दाखल होणार आहेत. यामध्ये वरिष्ठ लिपिक, लिपिक, बेलीफ, शिपाई, चालक यांचा समावेश आहे. त्यांना राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कोल्हापुरातील एक हॉटेल भाड्याने घेण्यात आले आहे.
स्वतंत्र पोलीस चौकी?
सर्किट बेंच सुरु झाल्यानंतर या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी असणार आहे. इमारतीचे संरक्षण, न्यायमूर्तीचा प्रोटोकॉल, येणाऱ्या-जाणाऱ्या अशीलांची तपासणी होणार आहे. यामुळे सर्किट बेंचसाठी स्वतंत्र पोलीस चौकी होण्याची शक्यता आहे. याचसोबत सर्किट बेंच इमारतीचा परिसर नो पार्किंग झोन किंवा नो व्हेईकल झोन करण्यात येणार आहे. केवळ न्यायमूर्ती, कर्मचारी आणि वकीलांचीच वाहने इमारतीमध्ये सोडण्यात येणार आहेत.
"कोल्हापुरात सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे 43 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला यश आले. हा लढा केवळ वकीलांचा नसून, पक्षकारांचाही होता. सर्किट बेंच कोल्हापुरात झाल्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैशाची बचत होणार आहे. याचसोबत त्यांना प्रत्यक्ष उच्च न्यायालयात जाऊन दाद मागता येणार आहे. न्यायदानाचे काम प्रत्यक्ष पाहता येणार आहे."
- अॅड. विवेक घाटगे, सदस्य महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल
सिंगल बेंचकडे दाखल होणारे खटलेs
- अटकपूर्व जामीन अर्ज
- रेग्युलर जामीन अर्ज
- फर्स्ट अपील
- सेकंड अपील
डिव्हिजन बेंचकडे दाखल होणारे खटले
- रिट याचिका
- एफआयआर रद्द करण्याच्या याचिका
- जनहित याचिका
- न्यायमूर्तींचे बेंच
- फौजदारी न्यायालय
- अपिलीय न्यायालय
- दिवाणी न्यायालय
- रिट दाखल न्यायालय