Kolhapur Circuit Bench: इमारत सज्ज, 95 टक्के काम पूर्ण, 24 तास राबले 500 कर्मचारी
प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजासाठी इमारत सज्ज राहणार आहे
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) समोरील जुन्या इमारतीमध्ये सुरू होत असलेल्या सर्किट बेंचच्या इमारतीचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. यातील केवळ डागडुजीकरण, रंगकाम, साहित्यांची जुळवाजुळव, लाईट फिटींग, फिनिशिंग अशी किरकोळ कामे शिल्लक राहिली आहेत.
दोन दिवसात सर्वच काम पूर्ण होणार असुन प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजासाठी इमारत सज्ज राहणार आहे. सर्किट बेंचच्या इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी 500 कर्मचारी 24 तास राबले आहेत. गेल्या एक महिन्यापासून याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
सध्या कर्मचाऱ्यांकडून साहित्यांची जुळवाजुळव करण्याची धांदल सुरू असुन प्रशासकीय अधिकारी उर्वरीत काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी तळ मारून उभे आहेत. इमारतीला चाहोबाजूंनी झळाळी देण्यात आली आहे. इमारतीच्या समोरील सर्वच जागा मोकळी केली जात आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर न्यायालयीन कामकाजात व्यत्यय येऊ नये, यासाठी आधुनिक जनरेटर बसवला आहे.
महिला व पुरूषांचे बार हॉल तयार झाला आहे. केवळ दोन हेरिटेज इमारतींचे केवळ नूतनीकरण केले आहे. तेथील नवीन इमारतीमध्ये 4 कोर्ट रुम उभारण्यात आल्या आहेत. एक कोर्ट रुम याच परिसरातील वकिलांच्या रुममध्ये तयार करण्यात आली आहे.
सोमवार (दि. 18) ऑगस्टपासून सर्किट बेंचचे काम सुरु होणार आहे. यासाठी इमारत सज्ज झाली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. सर्किट बेंचच्या नवीन इमारतीमध्ये दोन न्यायमुर्तीसाठी एक डिवीजन बेंच, प्रत्येकी एक न्यायमूर्तींसाठी दोन बेंच कार्यरत असणार आहेत.
17 रोजी उद्घाटन, 18 रोजी प्रत्यक्ष कामकाज सरू
नुतनीकरण झालेल्या सर्किट बेंचच्या कामकाजासाठी 500 कर्मचारी अहोरात्र राबले आहेत. रविवार दि.17 रोजी मेरी वेदर मैदानावर सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सोमवार दि.18 रोजी प्रत्यक्ष न्यायालयीन कामाकाजाला सुरूवात होणार आहे.
सीपीआरचे प्रवेशद्वार बदलण्याची शक्यता
सीपीआर समोरील इमरतीमध्ये सर्कीट बेंचची इमारत असुन याठिकाणी वाहतुक कोंडीची शक्यता आहे. कोणतही अडथळा होऊ नये, यासाठी सीपीआरमध्ये येण्याजाण्याच्या मार्गात व प्रवेशद्वारात बदल होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या अॅम्ब्युलन्सचे पार्किंग बंद करण्यात येणार आहे. परिसरातील विक्रेते व अमिक्रमण हटवले आहे.
हेरिटेजचा लुक अबाधित
राधाबाई इमारत व फॅमिली कोर्टची इमारत या दोन्ही वास्तू हेरिटेजमध्ये येतात. नूतनीकरण करताना दोन्ही वास्तूंच्या मुळ स्वरुपाला कोणत्याही स्वरुपाचा धक्का लागू नये याची काळजी घेतली आहे. वास्तुच्या दगडावरील जूना रंग काढून चकाकी दिली आहे. येथील सागवानी लाकडास उत्कृष्ट तंत्रज्ञाने रंगरंगोटीचा लुक दिला आहे.