Kolhapur Circuit Bench: ब्लॅक कोटसह आता ब्लॅक गाउन, 6 जिल्ह्यातील वकिलांना बंधनकारक
सहा जिह्यातील 60 हजार खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग होणार आहेत
By : आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर झाले असून, सोमवार (दि.18) ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होणार आहे. यामुळे कोल्हापुरातील वकिलांना त्यांच्या पेहराव्यामध्येही बदल करावा लागणार आहे. जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या वकिलांना सर्किट बेंचमध्ये युक्तीवाद करताना ब्लॅककोट सोबतच आता
ब्लॅक गाऊनही परिधान करावा लागणा आहे.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे सहा जिह्यातील 60 हजार खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग होणार आहेत. कोल्हापुरात सहा जिह्यातील वकीलांसह, मुंबई, पुणे यासह विविध ठिकाणाहून वकील येणार आहेत.
जिल्हा न्यायालयापेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रोटोकॉल वेगळे असतात. यामुळे सहा जिह्यातील वकिलांना सर्किट बेंचमध्ये युक्तीवाद करत असताना त्यांच्या पेहराव्यामध्येही बदल करावा लागणार आहे. पूर्वी केवळ काळा कोट आणी काळी पँट वापरणाऱ्या वकिलांना आता यासोबतच काळा गाउन आणि पांढरा बँड वापरावा लागणार आहे.
यासाठी मुंबई येथून एक विक्रेता गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात आला आहे. विविध साईज आणि कापड्याच्या गुणवत्तेनुसार या गाउनचे दर आकारण्यात येत आहेत. 1 हजार 500 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत गाउनचे दर आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे 400 हून अधिक वकिलांनी अशा प्रकारे ब्लॅक गाउन खरेदी केला आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथेच अशा प्रकारच्या ब्लॅक गाउनची विक्री करण्यात येत होती.
वकिलांच्या पेहरावाची पार्श्वभूमी
भारतातील वकिलांचा पेहराव हा ब्रिटिश राजवटीतील कायदेशीर परंपरेचा वारसा आहे. 19 व्या शतकात, ब्रिटिशांनी भारतात औपचारिक न्यायिक व्यवस्था स्थापन केली तेव्हा त्यांनी आपल्या देशातील वकिलांच्या पेहरावाचे नियम लागू केले. हे नियम कालांतराने भारतीय संदर्भात बदलले गेले, परंतु मूळ स्वरूप आणि औपचारिकता कायम राहिली.
अॅडव्होकेट्स अॅक्ट, 1961 अंतर्गत कलम 49(1) (जीजी) अंतर्गत, बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) वकिलांच्या पेहरावाचे नियम ठरवते. यानुसार, उच्च न्यायालयात काळा गाऊन आणि पांढरा बँड अनिवार्य आहे. न्यायालयीन शिष्टाचार: उच्च न्यायालयात वकिलांनी योग्य आणि औपचारिक पेहरावातच उपस्थित राहावे, असा नियम आहे.
पांढरा शर्ट आणि काळी पँट/साडी
- पुरुष वकील सामान्यत: पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान करतात.
- महिला वकिलांना पांढरा शर्ट आणि काळी पँट किंवा साडी परिधान करण्याची परवानगी आहे. काही प्रकरणांमध्ये, महिला वकील पांढऱ्या रंगाची सलवार-कुर्ता किंवा चुडीदार देखील परिधान करू शकतात.
- साडी किंवा सलवार-कुर्ता साधा आणि औपचारिक असावा, ज्यामुळे न्यायालयीन शिष्टाचाराला धक्का लागणार नाही.