बोरवडेच्या माळरानावर भानामती आणि अघोरी पुजा! भितीने शेतकऱ्यांनी शेताकडे पाठ!
अज्ञातांचा शोध घेण्याची मागणी
सरवडे प्रतिनिधी
बोरवडे ( ता. कागल ) गावच्या हद्दीत असलेल्या उजव्या कालव्याच्या वरील बाजूवर डोंगर भागात अज्ञातांनी दगड एकत्रित करुन अघोरी पुजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भानामतीच्या या प्रकाराने या भागातील शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले असून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनेमागील अज्ञातांचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, निपाणी- देवगड राज्यमार्गावरील बोरवडे गावच्या दक्षिणेला काळम्मावाडी प्रकल्पाचा उजवा कालवा आहे. त्याच्या वरील बाजूला डोंगरभाग असून पठारावर काही शेतकऱ्यांची शेती आहे. सध्या येथे गवतकापणीचे काम सुरु असून या ठिकाणी गेलेल्या शेतकऱ्यांना एका ठिकाणी दगड मांडून त्यावर शेंदूर फासल्याचे दिसले. या ठिकाणी मोठे सहा ते सात आणि काही लहान दगड ठेवले आहेत.
यापैकी मोठ्या दगडांवर भगव्या रंगाचे कापड घालून त्यांना फुलांचा हार घातला आहे. त्यांच्या शेजारी लहानलहान दगड ठेवले असून आजूबाजूला पुजेचे हळदकुंकु व अन्य साहित्य पडले आहे. हा प्रकार भानामतीचा असल्याचा ग्रामस्थांना संशय असून या घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय याठिकाणी जाण्यास शेतमजूर धजावत नसल्याने परिसरातील शेती कामे ठप्प झाली आहेत.
" बोरवडे गावच्या हद्दीत अज्ञातांनी केलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या भागात जाण्याचेही त्यांनी टाळले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा प्रकार असून तो निंदनीय आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. "
विनोद वारके, उपसरपंच बोरवडे.