शिवसेनेतर्फे सोमवारी कोल्हापूर-बेळगाव ‘मशाल रॅली’
बेळगाव येथील ‘काळादिन’ समर्थनार्थ आयोजन
प्रतिनिधी /कोल्हापूर
बेळगाव येथे 1 नोव्हेंबर रोजी होणाऱया काळय़ादिनाच्या समर्थनार्थ शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे गट) सोमवार दि. 31 रोजी कोल्हापूर-बेळगाव ‘दिवस वेदनांचा-दौड मशालीची’ या मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी समाधीस्थळ येथून सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या रॅलीला सीमाभागात प्रवेश न दिल्यास गनिमीकाव्याने प्रवेश केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
देवणे व पवार म्हणाले, केंद्र सरकारने 17 जानेवारी 1956 ला प्रांतरचना जाहीर केली. यानंतर झालेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मे झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार हे चार जिल्हे व हैदराबाद प्रांतात असणारे बिदर व गुलबर्गा हे जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ट केले. त्यामुळे त्या दिवसापासून 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळला जातो. यावेळी 1 नोव्हेंबरला बेळगाव येथे काळादिन पाळला जाणार असून या दिवशी रॅली निघणार आहे.
या रॅलीच्या समर्थनार्थ तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ मिळावे, यासाठी शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे) सोमवारी सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधीस्थळापासून ‘दिवस वेदनांचा-दौड मशालीची’ या मशाल
रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीच्या सुरुवातीला रथामध्ये मशाल व भगवा ध्वज असणार आहे. त्यापाठोपाठ चारचाकी वाहनांतून शेकडो सैनिक रवाना होणार आहेत. कागल, निपाणी, संकेश्वर, हत्तरगी या ठिकाणी मशालीचे मराठी बांधवांतर्फे स्वागत होऊन पूजनही केले जाणार आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांनी रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
या मशालीच्या पूजनासाठी शिवसेनेचे बेळगाव-निपाणीचे नेते व म. ए. समितीचे नेते दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, मनोहर किणेकर, शिवाजी सुंठकर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, प्रकाश मरगाळे, सचिन गोरले, दिलीप बैलूरकर, किरण गावडे आदींना निमंत्रित केले जाणार आहे. या रॅलीमध्ये सीमाभागातील मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे.
महाराष्ट्रानेही काळादिन पाळावा : युवा समितीच्या बैठकीत आवाहन
भाषावार प्रांतरचनेनंतर अन्यायाने बेळगावसह संपूर्ण सीमाभाग म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. याची चीड आजही मराठी भाषिकांच्या मनात असून काळय़ादिनाच्या माध्यमातून सीमावासीय आपला निषेध व्यक्त करीत असतात. 1 नोव्हेंबर रोजी केवळ बेळगाव व सीमाभागातच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हय़ात काळादिन पाळून सीमावासियांच्या व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवा, असे आवाहन युवा समितीच्या बैठकीत करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी टिळकवाडी येथील कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके होते. 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱया मूक सायकलफेरीमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होणे, तसेच बेळगावच्या शेतकऱयांना देशोधडीला लावणाऱया रिंगरोडला विरोध दर्शविण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला.
उपाध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, सायकलफेरीत सहभागी होताना शिस्त पाळून कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घ्यावी. सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमाप्रश्न देशभरात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, रणजीत हावळाण्णाचे, अभिजीत मजुकर, राजू पाटील, बापू भडांगे, विनायक कावळे, शुभम मण्णूरकर, महेश मण्णूरकर, आनंद पाटील, भावेश बिर्जे, दत्ता पाटील, निखिल देसाई, महेश चौगुले, मयुर अनगोळकर, भरमा पाटील, प्रथमेश मण्णूरकर यांसह मोठय़ा संख्येने युवक उपस्थित होते.