अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी खुला ! घाटात कोसळलेली दरड हटवण्यात यश
राजापूर वार्ताहर
राजापूर-कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटविण्यात अखेर तिसऱ्या दिवशी यश आले. सोमवारी सायंकाळी रस्त्यावर कोसळलेली पूर्ण दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. सायंकाळी उशिरा दुहेरी वाहतूकही सुरू होईल अशी माहिती माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
कोकणाला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटामध्ये शनिवारी पहाटेच्या दरम्यान दरड कोसळली होती. घाटातील पिकनिक स्पॉटपासून वरच्या बाजूला काही अंतरावर ही दरड कोसळली होती. त्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम शनिवारी सकाळपासूच हाती घेण्यात आले. मात्र, मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठमोठ्या असलेल्या दगडांमुळे रस्ता मोकळा करण्याच्या कामामध्ये सातत्याने व्यत्यय येत होता. त्यातच संततधार पडणारा पारूस व त्यामुळे निर्माण होणार चिखल दलदल यामुळे काम करणे अधिकच जिकरीचे होत होते.
जेसीबी आणि तीन डंपरच्या सहाय्याने घाटमार्ग मोकळा करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू होते. तर मोठे दगड हटविण्यासाठी ते फोडण्यासाठी मशिनचाही वापर करण्यात आला. मोठे दगड ब्रेकरच्या सहाय्याने फोडण्यात आले. शनिवार, रविवार व सोमवारी दिवसभर हे काम सुरू होते. अखेर सोमवारी सायंकाळी दरड, माती, दगड पूर्णपणे हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी पुर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रमोद कांबळे, शाखा अभियंता स्वप्नील बावधनकर, स्थापत्य अभियंता ज्ञानदेव शेट्यो यांसह कर्मचारी तसेच ठेकेदार उपेंद्र शेट्यो व त्यांचे सर्व कर्मचारी, पोलीस प्रशासन आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. तर स्थानिकांनीही यासाठी मोलाचे सहकार्य केले.