आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री- नाईक यांचे निधन
कसबा बावडा येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे आज सकाळी 10 वाजता रक्षाविसर्जन
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका नीना अरूण मेस्त्री-नाईक (वय 58 , रा. ताराबाई पार्क, पितळी गणपती परिसर, कुसुमेश अपार्टमेंट) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. शनिवारी दुपारी 4.30 वाजता कसबा बावडा येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज रविवार (दि. 21) सकाळी 10 वाजता रक्षाविसर्जन आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगी असा परिवार आहे.
नीना मेस्त्री-नाईक यांनी सांगली व कोल्हापूर आकाशवाणीवर निवेदिका म्हणून 30 वर्षे काम केले. नाट्या, संगीत व साहित्य क्षेत्राशी त्यांची जवळीक होती. आकाशवाणीवर निवेदनाबरोबर पुस्तक, कथा, कादंबऱ्यांचे क्रमश: अभिवाचनही त्यांनी केले. ‘फोटोबाबु’ या त्यांच्या नभोनाट्याला विशेष पुरस्कार प्राप्त झाला होता. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. नभोनाट्या, प्रासंगिक आदी विषयांचे संहितालेखनही त्यांनी केले आहे. तसेच कवी गुलजार, तलत मेहमुद व लता मंगेशकर आणि कोल्हापूर अशा अनेक गायक व गीतकारांवर त्यांनी कार्यक्रम प्रसारित केले. आपल्या वेगळ्या शैलाने त्यांनी हजारो श्रोत्यांची मने जिंकली. सध्या त्या वरिष्ठ निवेदिका म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर त्यांनी काही वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच आकाशवाणीच्या हजारो श्रोत्यांनी सोशल मिडीयावरून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणीही शेअर केल्या. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. अंत्dयासंस्कारासाठी अनंत खासबारदार, महेश कराडकर, आकाशवाणीचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी, डॉ. गौतमीपुत्र कांबळे, राजप्रसाद धर्माधिकारी, नंदू दिवटे, डॉ. सुनीलकुमार लवटे, आदी उपस्थित होते.