कोल्हापूर @ 13°C
कोल्हापूर :
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने कोल्हापूरकर गारठले आहेत. मंगळवारी कोल्हापूरचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहिले. दिवसभर हवेत गारठा असल्याने स्वेटर, जॅकेट, कानटोपी अशा उबदार कपड्यांमध्येच नागरिकांचे दैनंदिन कामकाज सुरु होते. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे.
पुढील आठवड्यात जिल्ह्यातील किमान तापमान 14 ते 17 तर कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. त्यामुळे वाढलेल्या थंडीच्या कडाक्यात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीच्या लाटेत नागरिकांनी शीतपेय, शीत पाणी, वातानुकुलित यंत्रणा यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखण्याबरोबरच अन्य श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी या दिवसात उबदार कपडे वापरावेत. थंडीत पौष्टीक आहार, फळ, सुकामेवा असा आहार घ्यावा. शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आठवड्यात कोल्हापूरचे किमान आणि कमाल तापमान असे राहील
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
वार किमान कमाल
बुधवार 14 29
गुरुवार 16 31
शुक्रवार 17 31
शनिवार 16 31
रविवार 17 31
हिवाळ्यात आहाराबाबत काय खबरदारी घ्यावी
भाज्या, फळांचे सेवन करावे. यामधील जीवनसत्त्वे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णता मिळण्यासाठी शेंगदाणे, गुळ, खजूर अशा पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.
अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्या. थंड पदार्थांचे सेवन टाळा.
थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. यासाठी मिठाचे सेवन कमी करावे.