पादचारी पुलावरून जाण्यासाठीही लिफ्ट
कोल्हापूर :
रेल्वे प्रशासनाने प्लॅट फॉर्म क्रमांक 2 येथे लिफ्टची सुविधा केली असून गेल्या काही दिवसांपासून ही सेवा कार्यन्वित झाली आहे. यामुळे प्रवाशांना आता इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पुलाचे जिने धापा टाकत चढण्याची गरज भासत नाही. रेल्वेने सुरू केलेली ही सेवा विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी फायदाची ठरत आहे.
रेल्वे स्टेशनमधील उप स्टेशन प्रमुख यांच्या कार्यालयानजीक पादचारी पुल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व प्लॅट फॉर्म क्रमांक 2 वरील प्रवासी या पुलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जावू शकतात. तसेच शाहूपुरीतील भाजी मंडईकडून रेल्वे स्टेशनमध्ये येण्यासाठी तसेच रेल्वे स्टेशनमधून शाहूपुरी भाजी मंडईकडे जाण्यासाठीही या पुलाचा वापर होतो. या पुलावरून जाण्यासाठी जिने चढावे आणि उतरावे लागतात. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना हे शक्य होत नाही. इतर प्रवाशांनाही धापा टाकतच पादचारी पुलावरून जावे लागते. याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी लिफ्टची सोय केली आहे. सध्या शाहूपुरी भाजी मंडईकडून रेल्वे स्टेशनमध्ये येण्यासाठी सरकता जिना आहे. आता प्लॅट फॉर्म क्रमांक 2 वर लिफ्ट सुरू झाली आहे. दोन्हीकडून येणे जाण्यासाठी होणारी दमछाक यामुळे थांबली आहे.
गरज नसतानाही लिफ्टचा वापर
या पादचारी पुलाचा प्रवाशांना फायदा होत आहे. परंतू काही शाळकरी मुले गरज नसतानाही लिफ्टचा वापर करताना दिसून येतात. यामुळे वीजेचा अपवव्य होत आहे. तसेच लिफ्टमध्येही बिघाड होण्याचा धोका आहे. अशीच स्थिती राहिली तर रेल्वे प्रशासन ही सेवा बंद करू शकते. याचा फटका गरजवंताना बसणार यात शंका नाही.