ऑस्ट्रेलियाच्या ढिलाईमुळे कोहलीचे शतक: बॉर्डर
वृत्तसंस्था / मेलबोर्न
बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील पर्थच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीबद्दल माजी कर्णधार अॅलन बॉर्डरने नाराजी व्यक्त केली. या कसोटीत भारताच्या विराट कोहलीने तब्बल दीड वर्षांनंतर शानदार शतक झळकविले. ऑस्ट्रेलियाच्या ढिलाईमुळे कोहलीला हे शतक नोंदविता आले, असे प्रतिपादन माजी कर्णधार बॉर्डरने केले आहे.
या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी भारतीय गोलंदाजीसमोर साफ कोलमडली. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय जलद गोलंदाज अधिक प्रभावी ठरले. भारताच्या दुसऱ्या डावामध्ये कोहलीने चिवटपणे खेळपट्टीवर राहून शानदार झळकविले. गेली जवळपास दोन वर्षे कोहली फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत होता. पण पर्थमध्ये त्याला पुन्हा फलंदाजीचा सूर मिळाला. हे शतक झळकविताना कोहलीला विशेष कष्ट घ्यावी लागले नाहीत. पॅट कमिन्सच्या डावपेचाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना बॉर्डर म्हणाला की, ऑस्ट्रेलियन संघाकडून कोहलीला शतक नोंदविण्यासाठी ढिलाई मिळाली,असे चित्र पहवायास मिळाले. भारतामध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोहलीकडून दमदार फलंदाजी होऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाच्या भूमीतील कोहलीचे हे सातवे शतक आहे. कर्णधार कमिन्सच्या डावपेचावर माजी फलंदाज मॅथ्यु हेडनने जोरदार टिका केली आहे. कोहली फलंदाजीस आल्यानंतर कमिन्सला क्षेत्ररक्षणाचा व्युह अचूकपणे ठेवता आला नाही. मात्र जैस्वालच्या आक्रमक फलंदाजीचे हेडनने कौतुक केले आहे.