कोहली वनडे क्रममवारीत दुसऱ्या क्रमांकावर
रोहीत शर्मा अव्वल स्थानावर कायम
वृत्तसंस्था / दुबईक
भारताचा महान फलंदाज विराट कोहली बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचल्याने त्याला एकदिवशीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली आहे.
एप्रिल 2021 मध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकल्यापासून कोहली एकदिवशीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर राहिलेला नाही. परंतु द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेत भारतासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो अव्वल स्थानावर पोहोचण्याच्या जवळ आला आहे. तीन सामन्यांमध्ये 302 धावा जमविणाऱ्या 37 वर्षीय फलंदाजाला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले आणि त्याला ताज्या क्रमवारीत वढती मिळाली. तो आता दोन स्थानांची प्रगती करीत सहकारी रोहीत शर्माच्या मागे दुसऱ्या स्थानावर पोहोचला. रोहितने संपूर्ण मालिकेत 146 धावा जमवून रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले. विशाखापट्टणममधील मालिकेच्या अखेरच्या सामन्यात नाबाद 65 धावांची खेळी करुन कोहली आठ रेटिंग गुणांच्या आत आला. यामुळे भारताला तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकण्यास मदत झाली.
भारताचा एकदिवशीय कर्णधार शुभमन गिलने तीन सामन्यांची मालिका गमावूनही पाचवे स्थान कायम राखले तर हंगामी कर्णधार केएल राहुलने दोन अर्धशतके झळकावल्यानंतर एकूण 12 वे स्थान पटकाविले. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव गोलंदाजांच्या यादीत तीन स्थानांनी पुढे जावून तिसऱ्या स्थानावर पोहोचला. द. आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (तीन स्थानांनी पुढे जाऊन 13 व्या स्थानावर, एडन मार्करम (चार स्थानांनी पुढे जाऊन 25 व्या स्थानावर) आणि टेम्बा बावूमा (तीन स्थानांनी पुढे जावून 37 व्या स्थानावर) या त्रिकुटानेही एकदिवशीय फलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.
कटकमधील 101 धावांच्या मोठ्या विजयानंतर टी-20 क्रमवारीत अक्षर पटेल (दोन स्थानांनी पुढे जात 132 व्या स्थानावर), अर्शदीप सिंग (तीन स्थानांनी पुढे 20 व्या स्थानावर) आणि जसप्रित बुमराह (सहा स्थानांनी पुढे 25 व्या स्थानावर) या त्रिकुटाने प्रगती केली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात या सर्वांनी प्रत्येकी 2 बळी घेतले आणि भारताने द. आफ्रिकेला 74 धावांवर गुंडाळले. द.आफ्रिकेची ही टी-20 मधील सर्वात निचांकी धावसख्या आहे. विशाखापट्टणममध्ये द. आफ्रिकेविरुद्ध पहिले एकदिवशीय शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल कसोटी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेला भारतीय फलंदाज राहिला तर गिल आणि ऋषभ पंत अनुक्रमे 11 व्या आणि 13 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन अॅशेस कसोटी सामन्यांमध्ये सलग प्लेअर ऑफ द मॅच कामगिरीच्या आधारे डावखुरा गोलंदाज तीन स्थानांनी वरच्या स्थानावर पोहोचला आहे. स्टार्कने दोन्ही सामन्यांमध्ये 18 बळी घेतले आणि त्यामुळे तो कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग आणि आतापर्यंतच्या सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोहम्मद सिराज (12 वे), रवींद्र जडेजा (13 वे) आणि कुलदीप (14 वे) या भारतीय त्रिकुटाने एका स्थानांची प्रगती केली आहे. इंग्लंडच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत हॅरी ब्रुक दोन स्थानांनी घसरुन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. केन विल्यमसन (दुसरे) आणि स्टीव्ह स्मिथ (तिसरे) प्रत्येकी एक स्थानाने आघाडीवर आहेत. ब्रिस्बेन कसोटीत शतक झळकावणारा जो रूट त्यांच्या मागे आहे.