दिनेश कार्तिक लंडन स्पिरिटचा मेंटर, फलंदाजी प्रशिक्षक
वृत्तसंस्था / लंडन
भारताचा माजी फलंदाज दिनेश कार्तिक हंड्रेड फ्रँचायझी लंडन स्पिरिटमध्ये मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला असल्याची घोषणा संघ व्यवस्थापनाने बुधवारी केली.
इंडियन प्रीमियर लीगबाहेर कार्तिकचा सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत हा पहिलाच प्रवेश आहे. ‘लंडन स्पिरिटमध्ये डीकेचे स्वागत करणे आनंददायी आहे. तो खरोखरच खूप विचारी आहे आणि टी-20 आणि फ्रँचायझी क्रिकेटमधील त्याचा प्रचंड अनुभव आमच्यासाठी अमूल्य असेल,’ असे स्पिरिटचे क्रिकेट संचालक मो बोबट यांनी एका निवेदनात म्हटले आहे, त्यांच्यासोबत काम करणे खूप मजेदार आहे आणि तो जे काही करतो त्यात एक संक्रमणशील उर्जा आणि उत्साह आणतो, असेही बोबट म्हणाले. ते आरसीबीचे क्रिकेट संचालक देखील आहेत. कार्तिकने आयपीएल 2024 नंतर त्याची खेळण्याची कारकीर्द संपवली आहे. परंतु इतर लीगमध्ये तो दिसतो. 40 वर्षीय दिनेश सध्या युएईच्या आयएलटी-20 मध्ये शारजाह वॉरियर्सच्या रोस्टरमध्ये आहे. कार्तिकने एसए-20 च्या मागील आवृत्तीत पार्ल रॉयल्सकडूनही खेळला होता. ‘लंडन स्पिरिटमध्ये सामील होण्याची ही किती रोमांचक वेळ आहे. लॉर्ड्समध्ये काम करताना इंग्लंडचा उन्हाळा खरोखरच स्वप्नवत आहे. हे ते मैदान आहे जिथे मी भारतासाठी पदार्पण केले होते आणि मी माझा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. लॉर्ड्स माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. पुढच्या वर्षी संघ एकत्र येण्यासाठी आणि काही अपवादात्मक क्रिकेटपटूंसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे कार्तिक म्हणाला.
भारतासाठी 26 कसोटी, 94 एकदिवशीय आणि 60 टी-20 सामने खेळलेला कार्तिक स्पिरिटला पहिल्यांदाच हंड्रेड फायनलमध्ये पोहोचण्यास मदत करण्यासाठी प्रयत्नशील असेल.