आयपीएलच्या ऑक्शनसाठी कोडोलीच्या श्रेयस चव्हाणची निवड
सौदी अरेबियात 24 व 25 नोव्हेंबरला आयोजन
कोल्हापूर :
जगभरातील करोडो क्रिकेटप्रेमीमध्ये ग्लॅमरस झालेल्या क्रिकेटमधील इंडियन प्रिमीयर लीग-2025 (आयपीएल) स्पर्धेतील संघ निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऑक्शनमध्ये (लिलाव) कोल्हापूरच्या लेगस्पीनर गोलंदाज श्रेयस चव्हाणची निवड करण्यात आली आहे. जेहाद (सौदी अरेबिया) येथे 24 व 25 नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत मेगा ऑक्शनचे आयोजन केले जात आहे. करोडो ऊपयांची बोली लावून संघांमध्ये धुरंधर, तरबेज आणि दर्जेदार खेळाडूंना ऑक्शनद्वारे निवडण्यासाठी संघ मालक सज्ज झाले आहेत. अशा या ऑक्शनसाठी निवडला गेलेला कोडोली (ता. पन्हाळा) येथील श्रेयस चव्हाण हा कोल्हापूर जिह्यातील पहिलाच क्रिकेटर ठरला आहे.
आयपीएलने ऑक्शनमधून संघ निवडीसाठी जगभरातील विविध मात्तबर संघांमधील 574 खेळाडूंची अंतिम निवड केली आहे. या अंतिम निवडीच्या यादीत श्रेयस चव्हाणचा समावेश असणे हे कोल्हापूरी क्रिकेटसाठी अभिमानास्पद आहे. ऑक्शनमधून 10 संघांसाठी 204 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, 2023-24 या सालात झालेल्या एमपीएल क्रिकेट स्पर्धेतील 11 सामन्यात 21 बळी घेण्याचा पराक्रम श्रेयसने केला होता. कोल्हापूर टस्कर संघातून खेळताना केलेल्या या पराक्रमाची बीसीसीआयच्या समितीने दखल घेऊन श्रेयसची ऑक्शनसाठी निवड केली आहे. 21 वर्षीय या श्रेयस हा लेग स्पीन गोलंदाज आहे. ऑक्शनमध्ये त्याची बेस प्राईज 30 लाख इतकी आहे. आजवर श्रेयसने दोनदा एमपीएल स्पर्धा खेळल्या आहेत. तो कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व स्थानिक अण्णा मोगणे सहारा क्रिकेट अॅकॅडमीचा खेळाडू आहे.