कोडोलीचा सर्कल लाचलुचपतच्या जाळ्यात
सातारा :
फेरफार उतारा व 7/12 वर नाव नोंदणीसाठी 1 लाखांची लाच मागून 75 हजार स्वीकारताना कोडोलीच्या मंडलाधिकाऱ्याला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. अजित दादासाहेच घाडगे (वय 48, रा. कोडोली ता. जि. सातारा) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे खिंडवाडी (ता. सातारा) येथील गट नं 17/1/1 या शेतजमीनीच्या झालेल्या दस्तामधील लिहून घेणारे यांच्या वतीने कुलमुखत्यार आहेत. हा दस्त 60 गुंठे असून मूळ मालक यांनी दस्तावरुन लिहून घेणार यांचे नाव 7/12 सदरी न लागल्याचा फायदा घेवून विक्री केलेल्या 60 गुंठ्यापैकी 13 गुंठे जमीन ही विक्री केली आहे. त्यानंतर 2024 मध्ये मुळ मालक यांनी पुन्हा उर्वरित 47 गुंठ्यापैकी 10 गुंठे जमीन विक्री केली. त्यावरुन तलाठी खिंडवाडी यांनी ही 10 गुंठे जमिनीची नोंद 7/12 सदरी धरली.
त्यानंतर तक्रारदार यांनी मंडलाधिकारी कोडोली यांच्याकडे कुलमुखत्यारदार या नात्याने या नोदींवर आक्षेप नोंदवला. त्यावरमंडलाधिकारी कोडोली यांनी आक्षेपावरुन सुनावणी अंती तक्रारदार यांचा आक्षेप मान्य केला असल्याबाबतचा निर्णय देवून यावरील 10 गुंठे जमिनीच्या नोंदणीस स्थगिती दिली. दि. 22 मे रोजी मंडलाधिकारी अजित घाडगे यांनी तक्रारदार यांना तुमच्या आक्षेपावरुन हा फेरफार रद्द केला आहे. त्या कामाची व 7/12 वरील उर्वरित 47 गुंठे याची नोंद तुमच्या बाजूने घेण्याचे असे दोन्ही कामाचे मिळून 1 लाख रुपयांची मागणी केली. तसेच तुम्ही आता तुमचा दस्त चालु 7/12 इत्यादी सर्व कागदपत्रे व नोंद करण्याबाबतचा अर्ज तलाठी कार्यालय खिंडवाडी यांच्या कार्यालयात जमा करा. या 7/12 ची नोंद घ्यायची काम माझे, तुम्ही फक्त मला 1 लाख रुपये पोहोच करा. तलाठी कार्यालयातील नोंद व सदर नोंदीवरुन फेरफार उतारा चौकशी करुन 7/12 सदरी तुमचे नाव लावण्याची जबाबदारी माझी असे म्हणत अजित घाडगे यांनी 1 लाख रुपये लाच मागणी करुन पहिल्यांदा 75 हजार रुपये व 7/12 वर नाव आल्यावर उर्वरित 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 75 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.