स्वर्गाचा पक्षी अशी ओळख
‘मशीन गन’प्रमाणे असतो आवाज
ब्लॅक सिकलबिल हा स्वर्गाच्या पक्ष्यांच्या कुटंबातील एक पक्षी असल्याची मान्यता आहे. हा पक्षी या प्रजातीतील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा पक्षी आहे. याच्या नर पक्ष्याची लांबी सुमारे 110 सेंटीमीटरपर्यंत असू शकते. तर मादी पक्षाची लांबी सुमारे 55 सेंटीमीटर असते. या पक्ष्याचा आवाज एखाद्या मशीनगन धडधडत असावी अशाप्रकारचा असतो. सोशल मीडियात सध्या या पक्ष्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर एका युजरने ब्लॅक सिकलबिल पक्ष्याचा एक व्हिडिओ शेअर केला असून यात या पक्ष्याचा आवाज ऐकू येतो. 47 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहण्यास अत्यंत अद्भूत आहे. पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओवर लाइक्स, ह्यूज आणि कॉमेंट्सची संख्या सातत्याने वाढत आहे.
ब्लॅक सिकलबिल पक्ष्याची चोच अत्यंत लांब आणि खालच्या दिशेने वळलेली असते. तर याचे शेपूट अत्यंत लांब असते. हा पक्षी सेंट्रल न्यू गिनी आणि वोगेलकोप क्षेत्रातील पर्वतीय जंगलांमध्ये आढळून येतो. याचे वैज्ञानिक नाव एपिमाचस फास्टोसस असे आहे. हा पक्षी पाहण्यास अत्यंत सुंदर असून याचे पंख मोठमोठे असतात. नर ब्लॅक सिकलबिल पक्ष्याचा रंग गडद काळा आणि निळा असतो. याचमुळे या पक्ष्याचे शेपूट मिळविण्यासाठी आणि भक्ष्य म्हणून त्याची शिकार केली जाते. परंतु पापुआ न्यू गिनीमध्ये या पक्ष्याच्या शिकारीवर आता बंदी घालण्यात आली आहे. तरीही या पक्ष्याची शिकार करण्याचे प्रकार सुरूच असल्याने त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मादी ब्लॅक सिकलबिल पक्ष्याचा रंग फिकट पांढऱ्या स्वरुपाचा असतो. हा पक्षी सर्वाहारी आहे फळे, कीडे आणि छोट्या प्राण्यांची शिकार करत ते ग्रहण करत असतात.