महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानविज्ञानसंपन्न लोकांनी समाजात मिसळणे आवश्यक आहे

06:06 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंत म्हणाले, उद्धवा त्रिभुवनात माझ्यासाठी काही कर्तव्य असे नसले तरी त्यापलीकडे जाऊन लोकसंग्रह करावा ह्या उद्देशाने माझ्या सर्व हालचाली, वागणे सुरु असते. अवतारात हाच माझा स्वधर्म असतो. आता एक लक्षात घे की, लोकसंग्रह म्हणजे नुसती लोकांची गर्दी जमवणे नव्हे तर त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी एकत्र आणणे. मी आता निजधामाला जाणार असल्याने माझी जबाबदारी आता तुला निभावायची आहे.

Advertisement

यासाठी माझी परिपूर्ण अवस्था मी तुला अर्पण केली आहे. तेव्हा अवतारकाळात आत्तापर्यंत मी जसे कार्य करत आलो त्याप्रमाणे कार्य करणे ही आता तुझी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने लोकसंग्रह करण्यासाठी तू आता सर्व मोहमाया सोडून विरक्त हो. त्यासाठी मी तुला ह्याआधी सविस्तर वर्णन करून सांगितलेली अभेदभक्ती कर. अभेदभक्तीमध्ये कोणताही भेदभाव न करता समबुद्धीने ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षपणे करण्याचा समावेश होतो. तेव्हा अभेदभक्ती, वैराग्य, ज्ञान ह्याचे स्वत: आचरण कर म्हणजे त्याचे महत्त्व जाणून लोक त्याप्रमाणे वागतील. ह्यासाठी लोकांना एकत्र करणे ह्याला लोकसंग्रह असे म्हणतात.

उद्धवा, माझ्या उपदेशामुळे तुला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. आता तू त्रिभुवनात सर्वांना वंद्य झाला आहेस. त्यामुळे तू जसे वागशील तसेच लोक वागतील. लोकसंग्रह कसा करायचा हे तुला माहित आहेच तरीही तुझ्या निमित्ताने इतरांना माहित होईल म्हणून मुद्दामहून त्याबद्दल सांगतो. त्यानुसार जे जे आचरण करतील तेही धन्य होतील, असा माझा शब्द आहे. तू बद्रिकाश्रमात गेल्यावर तेथे तुला अनेक तीर्थे आढळतील परंतु त्यातील अलकनंदा सगळ्यात महत्त्वाची आहे. तिच्या नुसत्या दर्शनाने सर्व दोषांचा नाश होतो. तेव्हा प्रथम अलकनंदेत स्नान कर मग विधियुक्त तीर्थविधान कर. नंतर तेथे तू कशा पद्धतीने रहावेस म्हणजे तुझी जीवनशैली कशी असावी ते सांगतो. वस्त्रांचा त्याग करून वल्कले परिधान करायचा परिपाठ ठेव. फलाहार कर. लोकसंग्रहासाठी संपूर्ण निस्पृहतेने राहा. स्वत:च्या सुखासाठी द्वंद्वसहिष्णुता दाखव. तू ज्ञानविज्ञानसंपन्न असल्याने तुझ्या मनाला ‘हा आपला-तो परका’ अशी द्वंद्वबाधा कधीच होणार नाही आणि तुला त्याचे काही विशेष वाटणारही नाही पण लोकांचे हित साधण्याच्या दृष्टीने तू तिचे प्रकटीकरण केले पाहिजेस. त्यासाठी तू सर्वांना समान दर्जाची वागणूक देतोस हे लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजेस. तुला विषयांचा हव्यास वाटून तू कधीच त्यात आसक्त होणार नाहीस हे मला माहित आहे.

तरीही त्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात यावे म्हणून तू त्यांना इंद्रियसंयम करून दाखवायला पाहिजेस. तसेच तुझ्यातील सुशीलता तू इतरांना दाखवून द्यायला हवीस. तुला माझ्याकडून जे ज्ञान मिळाले आहे, त्याचे अनुसंधान राखून लोकांना त्याचे महत्त्व पटवून द्यायला हवंस. मनुष्य ज्ञानविज्ञानसंपन्न झाला की तो भेदाभेद मानत नाही, निरासक्त असतो, सुशील असतो हे सर्व जरी खरे असले तरी माणसाने ते आपल्या वर्तणुकीतून प्रकट केले नाही तर इतरांना त्याप्रमाणे वागण्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. म्हणून ज्ञानविज्ञानसंपन्न लोकांनी समाजात मिसळून त्यांना आत्मज्ञानाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. त्यासाठी लोकसंग्रह करणे आवश्यक आहे. ह्याप्रमाणे तू व्रतस्थ होऊन राहिल्यावर, तुला माझ्याकडून आत्मज्ञान प्राप्त झाले आहे हे माहित झालेले खुपजण तुला शरण येतील. तेव्हा त्यांचा उद्धार करणे हे तुझे कर्तव्य असेल कारण ज्याला ब्रह्मज्ञान झालेले आहे तो स्वत: उद्धरून जातो पण ते ज्ञान त्याने इतरांना न देऊन त्यांचा उद्धार न करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. शिष्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश न करणे हे निष्ठाहीन निर्वीर्य माणसाचे काम आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article