गोकाक येथे विद्यार्थ्यावर मित्रांकडून चाकूहल्ला
वर्गातून बॅग आणली नाही म्हणून मित्रांचे कृत्य
बेळगाव : दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्ग मित्रांनी चाकूहल्ला केला आहे. गुरुवारी सायंकाळी गोकाक येथे ही घटना घडली असून चाकूहल्ल्यातील जखमी विद्यार्थ्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. प्रदीप बंडीवड्डर (वय 16 रा. गोकाक) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे गुरुवार दि. 2 जानेवारी रोजी प्रदीप शाळेला गेला होता. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला वर्गातून आपली बॅग आणण्यास सांगितले. प्रदीपने त्यांची बॅग आणली नाही म्हणून त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला आहे.
जखमी प्रदीपला सुरुवातीला गोकाक येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. प्रदीपच्या वर्गातील तिघा मित्रांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळाली असून गोकाक पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. चाकूहल्ल्याची माहिती प्रदीपच्या नातेवाईकांना समजताच ते इस्पितळात दाखल झाले. विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ माजली असून गोकाक शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्रदीपच्या हातावर, पोटावर व गळ्यावर वार करण्यात आले आहेत.