आठ एकरमधील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
शहापूर-धामणे शिवारातील घटना : लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर शिवारातील उसाच्या मळ्याला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. आगीमध्ये सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला असून यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र, शनिवारी सकाळी उसाच्या मळ्याला अचानक आग लागल्याने यामध्ये सुधीर बिर्जे, विनायक बिर्जे, देवकुमार बिर्जे, माधव बिर्जे, चिन्नाप्पा होसूरकर व पांडुरंग बाळेकुंद्री यांच्या मालकीचा ऊस जळून खाक झाला आहे. शहापूर शिवाराच्या दक्षिण भागात धामणे रोडच्या शेजारी असलेला आठ एकर ऊस जळाला आहे. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी अचानक उसातून धूर येऊ लागल्याने आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी उसाच्या फडाला आग लागल्याचे दिसून आले. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे काहींनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बराच उशीर पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यामध्ये आठ एकर परिसरातील ऊस जळून खाक झाला असून एका शेडचेही नुकसान झाले. आगीच्या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या आगीच्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.