केएमटी ‘मेकॅनिकल’चा डोलारा ‘फिटरवर’...
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
केएमटीच्या वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांची विविध पदावरील भरती व पदोन्नती रखडल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. 188 मंजूर पदांपैकी तब्बल 122 पदे रिक्त आहेत. केवळ 74 कर्मचाऱ्यांवर केएमटी वर्कशॉपच्या कामाचा भार सांभाळला जात आहे. यामुळे केएमटी वर्कशॉपमधील ‘मेकॅनिकल’च्या कामाचा डोलारा ‘फिटर’ कर्मचाऱ्यांवर अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वर्षानुवर्षे पदोन्नतीच झाली नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मेकॅनिकल विभागातील पदोन्नती झाली नसल्यामुळे मेकॅनिकल आर्ट व हेड मेकॅनिकल पदेच रिक्तच पडली आहेत. मेकॅनिकल पदांसाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने फिटर कर्मचारीच मेकॅनिकलची कामे करत आहेत. हेड मॅकेनिक, मेकॅनिक आर्ट ए, बॉडी रिपेअर आर्ट ए व बी या जागेसाठी 18 पदे मंजूर आहेत. मात्र, यातील एकाही पदावर नियुक्ती झाली नाही. त्यामुळे या जागा रिकाम्याच आहेत.
- शारीरीक व मानसिक आरोग्यावर परिणाम
वर्षानुवर्षे पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. कर्मचाऱ्यांना जादा तास ड्युटी करावी लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच, रिक्त पदांमुळे वर्कशॉपची कार्यक्षमता व परिवहन सेवेची विश्वासार्हता यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- ठोस उपाययोजनांची गरज
केएमटी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये थकवा आणि तणाव वाढत आहे. कर्मचारी संघटनांनी त्वरित भरती प्रक्रिया राबवून रखडलेल्या पदोन्नतींना गती द्यावी, अशी वारंवार मागणी केली आहे. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.
- नवीन आकृतीबंध आराखड्यास मंजुरी
महापालिकेच्या रिक्त पदांची भरती व पदोन्नतीसाठी नवीन आकृतीबंध आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. हीच पद्धत केएमटीच्या सर्वच विभागात लागू होणार आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. यानंतर भरती व पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
- असा आहे केएमटीचा वर्कशॉप
विभाग मंजूर पदे नियुक्त पदे रिक्त पदे
मेकॅनिकल स्टाफ : 117 46 71
इलेक्ट्रीकल : 9 4 5
टायर विभाग : 8 3 5
ब्लॅकस्माथ विभाग : 9 7 2
बॉडी रिपेअर विभाग : 7 1 6
वेल्डर विभाग : 5 2 3
पेंटर विभाग : 4 1 3
प्रशासकीय स्टाफ : 11 2 9
एकूण : 170 66 8 104 10
- या पदावर नियुक्तीच नाही
विभाग मंजूर पदे नियुक्त पदे रिक्त पदे
हेड मेकॅनिक : 4 00 4
मेकॅनिक आर्ट ए : 9 00 9
बॉडी रिपेअर आर्ट ए : 2 00 2
बॉडी रिपेअर आर्ट बी : 3 00 3
एकूण : 18 00 18