केएमएफ कर्मचारी शनिवारपासून संपावर
बेंगळूर : वेतनवाढीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक दूध महामंडळाच्या (केएमएफ-कर्नाटक मिल्क फेडरेशन) अधिकारी व कर्मचारी 1 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यात दूध पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनवाढ, इतर सुविधा देण्याची मागणी केली असून मागण्या मान्य न केल्यास 1 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा निर्णय केएमएफ आणि सर्व दूध वितरण संघांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याविषयी केएमएफचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे दूध संघांना त्यांच्या न्यायसंमत सुविधा मिळत नाहीत. सातव्या वेतन आयोगाचा अहवाल जारी झाला तरी दूध संघटनांवर कोणताही भार पडणार नाही. तरी देखील आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बेमुदत संप पुकारणे अनिवार्य असल्याचे केएमएफच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. संपामुळे दुग्धोत्पादन क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.