कार अपघातात 8 पर्यटक जखमी
हल्ल्याळ-दांडेलीतील ताटगेरा फाट्याजवळ घटना
कारवार : कारने झाडाला धडक दिल्याने कारमधील 8 पर्यटक जखमी झाल्याची घटना हल्ल्याळ-दांडेली रस्त्यावरील ताटगेरा फाट्याजवळ घडली. जखमींपैकी एका पर्यटकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पर्यटक हुबळी येथील असल्याचे सांगण्यात आले. हुबळी येथील 8 पर्यटक इनोव्हा कारमधून दांडेलीच्या दिशेने निघाले होते. कार दांडेली-हल्ल्याळ रस्त्यावरील ताटगेरा फाट्याजवळ आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व त्यानंतर कारने रस्त्याजवळच्या झाडाला जोराची धडक दिली व पुढे ती कार उलटली. कार उलटल्याने अनुप नावाच्या पर्यटकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर दांडेली येथील सार्वजनिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारासाठी धारवाड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या अन्य पर्यटकांची नावे मोहम्मद पुकान, मलिक इरफान नदाफ, अलीसाब इरफान, कौशीक नंदन अशी आहेत. अपघातामुळे इनोव्हा कारची मोठी हानी झाली आहे. दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश, साहाय्यक उपनिरीक्षक वेंकटेश तग्गीन यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. दांडेली ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.