बायोमेट्रीक मशिन असतानाही गौडबंगाल! काही कर्मचारी पंचिंग करून थेट घरी : वरकमाईमुळे मुकादमही सामिल
कामचुकार कर्मचाऱ्यांवर वेसन कोण घालणार
विनोद सावंत कोल्हापूर
कामावर तर हजर नाहीत मात्र, महिना अखेरीस संपूर्ण महिन्यांची हजेरी नोंद करून पगार घेणारे कर्मचारी महापालिकेत होते. अशा कर्मचाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी महापालिकेने बायोमेट्रीक मशिन बसविली. परंतू कामचुकार कर्मचाऱ्यांवर याचाही काही परिणाम झालेला दिसत नाही. काही कर्मचारी पंचिंग करून थेट घरीच जात आहेत. पगारामधील काही हिस्सा मुकादमला पोहोच होत असल्याने तेही यामध्ये सामील होत आहेत.
महापालिका प्रशासकांनी नुकतेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही पंचिंग सक्तीचे केले आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे काही कर्मचारी पंचिंग सक्तीमधूनही पळवाट काढत आहेत. त्यांच्याकडून थेट मुकादमलाचा मॅनेज केले जात आहे. कामावर हजर न राहता केवळ सकाळी आणि सायंकाळी पंचिंग करण्यासाठी काही कर्मचारी मनपा कार्यालयात येतात आणि दिवसभर घरीच असतात. मुकादमांना त्यांच्या पगारातील वाटा मिळत असल्याने तेही यामध्ये सामिल होत आहेत. यामुळेच काही कर्मचाऱ्यांना दर महिन्यांचा पगार घर बसल्या मिळत आहे. महापालिकेचे लाखो रूपयांचा फसवणूक यातून होत आहे. अशा प्रवृत्तींना अळा बसण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.
सर्वच कर्मचाऱ्यांचे 26 दिवस कसे भरतात?
रोजंदारी कर्मचाऱ्यांचे दिवस भरले तरच पगार मिळतो. घरगुती काम, आजारी असल्यास त्यांचा खडा पडतो. पगार कमी मिळू नये म्हणून या माधील काहीजण केवळ पंचिंगसाठी कार्यालयात येतात. इतर वेळी आपली कामे करतात. मध्यंतरी यावरूनच रोजंदारी कर्मचाऱ्यांचे 26 दिवस कसे भरतात, असा सवालही उपस्थित झाला होता. मात्र, याचे पुढे काहीही झाले नाही.
निम्मा पगार मुकादमाला
कर्मचाऱ्याला 720 रूपये हजेरी असली दहा दिवस त्यांने कामावर न येताच पंचिंग केले असले तर पाच दिवासची पगाराची रक्कम संबंधित मुकादमला द्यावी लागते. मनपामध्ये बहुतांशी रोजंदारी मुकादम आहेत. त्यांना पगार कमी असल्याने तेही यासाठी पुढे असतात. बहुतांशी वॉचमन रोजंदारीवरील आहेत. यामधील काही वॉचमन पंचिंग करून घरातील कामे करण्यासाठी जातात.
पंचिंगकडून थेट गोव्यात
मनपा नजीकच्याच एका विभागीय कार्यालयात डांबरी कामावरील रोजंदारी मुकादम बोगस हजेरीची नोंद करून बक्कळ पैसा कमवत आहे. एके दिवशी त्यांने सकाळी पंचिंग करून पाच-सहा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गोवा सहल केल्याचीही चर्चेचा विषय आहे. तसेच पंचिंग करून घरी जाणाऱ्या डांबरी कामावरील कर्मचाऱ्यांकडून त्याचा हप्ता ठरलेला आहे. काहींकडून तो कामावर नसणाऱ्या कर्मचाऱ्याचा सर्व दिवासाचे पैसे काढून घेत असल्याचीही चर्चा आहे.
सरप्राईज व्हिजीट दिल्यास पर्दापाश
वरीष्ट अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सरप्राईज व्हिजीट दिल्यास नेमके किती कर्मचारी कामावर असतात आणि किती कर्मचारी पंचिंग करून घरी जाता, हे समोर येणार आहे. मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार यांनी अशा प्रकारे विभागीय आरोग्य विभागात अचानक भेटी दिल्यानंतर काही कर्मचारी वेळेत कामावर हजर नसल्याचे समोर आले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. असेच सर्व विभाग प्रमुखांनी करणे आवश्यक आहे.
काही विभागात रोजंदारी कर्मचाऱ्यांची चलती
चारही विभागीय कार्यालयामध्ये कायम कर्मचाऱ्यांपेक्षा रोजंदारी कर्मचाऱ्यांची चलती आहे. त्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यांचाही वरदहस्त आहे. या मागे नेमके कारण काय हे शोधण्याची गरज आहे. या स्थितीमुळे कायम कर्मचाऱ्यांमध्ये वरीष्ठांविषयी असंतोष पसरत आहे.
रोजंदारी कर्मचारी कायम झाल्यानंतरच प्रश्न सुटणार
महापालिकेमध्ये सुमारे 510 रोजंदारी कर्मचारी आहेत. त्यांच्यासह ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. रोजंदारी कर्मचारी कायम झाल्यास त्यांना पुरेशा रजा मिळणार आहेत. त्यामुळे रोजंदारीमधील तरी पंचिंग करून घरी जाण्याचा प्रकार काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.