शटल बॅडमिंटन स्पर्धेत केएलएस, डीपी संघ विजेते
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व गोमटेश विद्यापीठ मजगाव आयोजित टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धेत शटल बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएलएस संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 2-1 तर मुलींच्या विभागात डीपी संघाने एम व्ही हेरवाडकर संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. वरील दोन्ही संघ शहर तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. उद्यमबाग येथील राजन बॅडमिंटन अकादमीच्या हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन गोमटेश विद्यापीठ स्कुलचे मुख्याध्यापक महांतेश हिरेमठ, प्रदीप पाटील, सिल्वया डिलिमा यांच्या हस्ते नेटची पूजन करून उद्घाटन करण्यात आले. मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एकेरीत केएलएसने बनशंकरी संघाचा 2-0, तर एम व्ही हेरवाडकरने मुक्तांगण संघाचा 2-0 पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत पहिल्या एकेरीत हेरवाडकरच्या चिन्मयने केएलएसच्या तेजस बेळगावकरचा 15-10, 10-15, 15-13 अशा सेटमध्ये पराभव केला. पण दुहेरीत केएलएसच्या तेजस बेळगावकर व तनई गिरी या जोडीने हेरवाडकरच्या चिन्मय व अवनीश या जोडीचा 15-9, 15-11 असा सेटमध्ये पराभव केले. रिव्हर सिंगल मध्ये केएलएसच्या तनई गिरीने हेरवाडकरच्या अनिसचा 15-12, 15-07 अशा सरळ सेटमध्ये पराभव करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले. मुलींच्या पहिल्या उपांत्य फेरीचा सामन्यात हेरवाडकरने केएलएसचा 2-0 तर दुसऱ्या उपांत्य फेरीत डीपी संघाने मुक्तानंदचा 2-0 पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात डीपी संघाने एम व्ही हेरवाडकर चा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. डीपी संघातर्फे साची तहसीलदार ,वैष्णवी, इलन जॉकी यांनी चांगला खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मजुकर, सिल्वया डिलिमा, देवेंद्र कुडची यांनी काम पाहिले.