केएलई, लव्हडेल उपांत्यपूर्व फेरीत
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लव्हडेल स्कूलने केएलई अंकली संघाचा तर केएलई संघाने आर्मी पब्लिक स्कूलचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. अजय लमाणी, युग शहा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटिनम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लव्हडेल सेंट्रलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 138 धावा केल्या. त्यात अजय लमाणीने 12 चौकारांसह 78 तर अंशने 4 चौकारांसह 33 धावा केल्या. केएलई अंकलीतर्फे आयुषने 2, गणेश, अमये व विवेकानंद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई अंकली संघाचा डाव 19.5 षटकात 114 धावात आटोपला. त्यात एस. एन. गणेशकुमारने 9 चौकारांसह 53 धावा केल्या. लव्हडेलतर्फे अंश व अथर्व यांनी प्रत्येकी 3 तर सुप्रीत व अमोघ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसरा सामन्यात केएलई इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 197 धावा केल्या. त्यात युग शहाने 9 चौकारांसह 57, कौस्तुभ पाटीलने 8 चौकारांसह 51, आदित्य भोगणने 5 चौकारांसह 29 तर आरव नलवडेने 14 धावा केल्या. आर्मी स्कूलतर्फे आयुष गवीने 2 तर मयुरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्मी पब्लिक संघाचा डाव 11 षटकात 39 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. केएलईतर्फे सयंम खोत, आतिथ भोगण व ओमकार यांनी प्रत्येकी 2 तर युगने 1 गडी बाद केला.
उपांत्यपूर्व फेरीचे सामने
- केएलएस वि. लव्हडेल सकाळी 9 वा.
- गजाननराव भातकांडे वि. केएलई इंटरनॅशनल दुपारी 1.30 वा.