केएलई लिंगराज कॉलेज सर्वसाधारण विजेते
उत्कृष्ट अॅथलिट्स : वैभवी बुद्रुक, भूषण पाटील भरतेश, भाऊराव काकतकर कॉलेज उपविजेते
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ आयोजित 9 व्या आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत 251 गुणासह केएलई लिंगराज महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पुऊषगटात 147 गुणासह लिंगराज महाविद्यालयाने विजेतेपद, भरतेश महाविद्यालयाने 24 गुणांसह उपविजेतपद मिळविले. महिलागटात 97 गुणासह केएलई लिंगराज कॉलेजने विजेतेपद तर भाऊराव काकतकर महाविद्यालयाने 46 गुणासह उपविजेतेपद पटकावले. लिंगराजच्या भूषण पाटीलने 2048 गुणासह तर महिला गटात वैभवी बुद्रुकने 1891 गुणासह सर्वोत्तम अॅथलिटसचा बहुमान मिळवला.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या या क्रीडास्पर्धेत बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नमा विद्यापीठाचे उपकुलगुरू सी त्यागराजन, प्रमुख पाहुणे डॉ. सागर देशपांडे, बेंगळूरचे तांत्रिक क्रीडाधिकारी सुंदरराज अर्स, संगोळी रायण्णा महाविद्यालयाचे प्राचार्य सी.एस पाटील, उमेश भट, व्ही. एच कलागदी, आरसीयूचे क्रीडा अधिकारी डॉ. जगदीश गस्ती, डॉ. रामकृष्ण, डॉ. रामराव सी, डी. मधुकर देसाई, खलीद खान, संतोष हरगुले, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सी त्यागराज यांनी केले. विजेत्या लिंगराज महाविद्यालय संघाला आकर्षक चषक, उपविजेत्या भरतेश व भाऊराव काकतकर महाविद्यालयाला चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट अॅथलिट भूषण पाटील व वैभवी बुद्रुक यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगावतील क्रीडा निर्देशक, क्रीडा शिक्षक आणि विशेष परिश्र्रम घेतले.