क्लासेन, कमिन्स, अभिषेक यांचे हैदराबाद संघातील स्थान कायम
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2025 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा हेन्रीच क्लासेन, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू पॅट कमिन्स तसेच भारताचा अष्टपैलू अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्स हैदराबाद संघातील आपले स्थान कायम राखले आहे. सदर माहिती सनरायझर्स हैदराबादच्या प्रवक्त्याने दिली. क्लासेनला अंदाजे 23 कोटी रुपये, पॅट कमिन्सला 18 कोटी तर अभिषेक शर्माला अंदाजे 14 कोटी रुपये मिळणार आहेत. अलिकडेच आयपीएल स्पर्धेच्या आयोजकांनी घेतलेल्या बैठकीमध्ये 2024 च्या आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या सहा खेळाडूंना 2025 च्या आयपीएल स्पर्धेसाठी प्रत्येक संघाच्या फ्रांचायझीला ठेवण्याची मुभा दिली होती. त्यानुसार हैदराबाद संघाने तीन खेळाडूंचे स्थान कायम राखले आहे. 2025 च्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावावेळी एकूण रक्कम निश्चित केली आहे. या संघाला खेळाडूंना लिलावात खरेदी करण्यासाठी 120 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.