मँचेस्टर कसोटीत केएल, गिलची शतकाकडे वाटचाल
चौथ्या दिवशी भारताच्या 2 बाद 174 धावा : अद्याप 137 धावांनी पिछाडीवर : इंग्लंडचा 669 धावांचा डोंगर
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
केएल राहुल (नाबाद 87) आणि कर्णधार शुभमन गिल (नाबाद 78) यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने चौथ्या दिवशी 2 गडी गमावत 174 धावा केल्या. गिल आणि केएल चौथ्या दिवसअखेर नाबाद असून त्यांची शतकाकडे वाटचाल सुरु आहे. तरीही चौथ्या दिवसअखेरीस यजमान संघाकडे 137 धावांची आघाडी आहे. यामुळे आजचा सामन्याचा पाचवा दिवस महत्वपूर्ण असेल. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात तब्बल 669 धावांचा डोंगर उभा केला. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला 311 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
प्रारंभी, चौथ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावातील 136 व्या षटकापासून आणि 7 बाद 544 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी बेन स्टोक्स 77 तर लियाम डॉसन 21 धावांवर नाबाद होता. हे दोघे चौथ्या दिवशीही चांगली सुरूवात देण्याच्या प्रयत्नात होते. मात्र 140 व्या षटकातच बुमराहने डॉसनला त्रिफळाचीत करत इंग्लंडला आठवा धक्का दिला. डॉसनने 26 धावांचे योगदान दिले. डॉसन आणि स्टोक्स यांच्यात 35 धावांची भागीदारी झाली होती. मात्र डॉसन बाद झाल्यानंतर ब्रेंडन कार्सने स्टोक्सची साथ दिली.
स्टोक्सचे दोन वर्षानंतर कसोटीत शतक
यादरम्यान, स्टोक्सने त्याचे कसोटीतील 14 वे शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, कसोटीमध्ये 2 वर्षांनी त्याने शतक केले आहे. यापूर्वी अॅशेस मालिकेत लॉर्ड्सच्या मैदानावर 2023 मध्ये अखेरचे शतक झळकावले होते. दरम्यान, कार्सेनेही आक्रमक पवित्रा घेतला. या दोघांत 95 धावांची भागीदारी झाली. भारतीयासाठी अडथळा ठरलेल्या स्टोक्सचा अडथळा जडेजाने दूर केला. स्टोक्सने 198 चेंडूत 141 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. कार्सचे अर्धशतक थोडक्यात हुकले. त्याला 47 धावांवर जडेजाने बाद करत इंग्लंडचा डाव संपवला. इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावा केल्या आणि त्यांना 311 धावांची भक्कम आघाडी मिळाली. भारताकडून जडेजाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. याशिवाय, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. अंशुल कंबोज आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
शुभमन गिल, केएलची शतकाकडे वाटचाल
इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 669 धावा करत 311 धावांची मोठी आघाडी घेतल्यावर सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या रुपात टीम इंडियाने विकेट गमावल्या. ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि साई सदुर्शन यांना लागोपाठ बाद करत भारताला मोठे धक्के दिले. दोघांनाही भोपळा फोडता आला नाही. यानंतर मात्र चहापानापर्यंत शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी करत पडझड हाऊ दिली नाही. या दोघांनी संयमी फलंदाजी करताना खराब चेंडूचा समाचारही घेतला. या दोघांत 174 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. शिवाय, दिवसअखेरीस या दोघांनी आणखी विकेट्स जाऊ दिल्या नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केएल राहुल 8 चौकारासह 87 तर गिल 10 चौकारासह 78 धावांवर खेळत होता. भारतीय संघाने 63 षटकांत 2 बाद 174 धावापर्यंत मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 358 आणि दुसरा डाव 63 षटकांत 2 बाद 174 (यशस्वी जैस्वाल 0, केएल राहुल 87, साई सुदर्शन 0, शुभमन गिल खेळत आहे 78, ख्रिस वोक्स 2 बळी).
इंग्लंड पहिला डाव 157.1 षटकांत सर्वबाद 669 (जॅक क्रॉली 84, बेन डकेट 94, ओली पोप 71, जो रुट 150, बेन स्टोक्स 198 चेंडूत 11 चौकार, 3 षटकारासह 141, डॉसन 26, कार्से 47, जडेजा 4 बळी, सुंदर-बुमराह प्रत्येकी दोन बळी).
मँचेस्टरमध्ये इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या
मँचेस्टरच्या मैदानावर एकाच डावात सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम इंग्लंडने केला आहे. आतापर्यंत मँचेस्टरमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, त्यांनी 1964 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच डावात 656 धावा उभारल्या होत्या, परंतु आता इंग्लंडने 669 धावा उभारून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
स्टोक्सची विक्रमांना गवसणी
- स्टोक्स एकाच कसोटीत शतक करणारा आणि 5 विकेट्स घेणारा इंग्लंडचा पहिलाच कर्णधार ठरला. याच सामन्यात त्याने भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना 5 विकेट्सही घेतल्या आहेत.
- स्टोक्सने या खेळीदरम्यान कसोटीत 7000 हजार धावाही पूर्ण केल्या. त्यामुळे कसोटीत 7000 धावा आणि 200 विकेट्स घेणारा तो जगातील फक्त तिसराच अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याने कसोटीत 225 हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

कसोटीत प्रथमच बुमराहची धुलाई
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात महागडी स्पेल टाकली आहे. बुमराहने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात 100 पेक्षा अधिक धावा खर्च केल्या आहेत. त्याला या डावात 2 गडी बाद करण्यात यश आले. पण यादरम्यान त्याने 112 धावा केल्या. त्याने सर्वाधिक धावा खर्च केल्या असल्या तरीदेखील या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत 14 गडी बाद केले आहेत.