केकेआरचा दिल्लीवर दणदणीत विजय
फिल सॉल्टचे धमाकेदार अर्धशतक : सामनावीर वरुण चक्रवर्तीचे 3 बळी
वृत्तसंस्था/ कोलकाता
फिल सॉल्टचे अर्धशतक तसेच सामनावीर वरून चक्रवर्तीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 21 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दडादणीत पराभव केला. या विजयामुळे कोलकाता संघाने स्पर्धेच्या गुणतक्यात 12 गुणासह दुसरे स्थान राखले आहे तर दिल्लीचा संघ 10 गुणासह सहाव्या स्थानावर कायम आहे.
सोमवारचा हा स्पर्धेतील 47 वा सामना होता. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या अचूक गोलंदाजीसमोर दिल्ली संघाला फटकेबाजी करता आली नाही. 20 षटकात दिल्लीने 9 बाद 153 धावा जमवित कोलकाता संघाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले. कोलकाता संघाने 16.3 षटकात 3 बाद 157 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
दिल्लीच्या डावामध्ये एकही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कुलदीप यादवने 26 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 35 धावांची खेळी केल्याने दिल्लीला 150 धावांचा टप्पा गाठता आला. कर्णधार ऋषभ पंतने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 27, पृथ्वी शॉने 7 चेंडूत 3 चौकारासह 13, मॅकगर्कने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 12, अभेषक पोरेलने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 18 धावा जमविल्या. कोलकाताने दिल्ली संघाच्या डावातील 9 व्या षटकात फिरकी गोलंदाज अरोराकडे चेंडू सोपवित वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीवर कर्णधार पंत, स्टब्स आणि कुमार कुशाग्र या तीन फलंदाजांना बाद केल्याने दिल्लीची फलंदाजी कमकुवत झाली. त्याने आपल्या 4 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले. दरम्यान वैभव अरोराने शॉ आणि होप यांना बाद केले. हर्षित राणाने पोरेल आणि रसिख सलाम याना बाद केले.
दिल्लीच्या डावामध्ये 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. दिल्लीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 67 धावा जमविताना 3 गडी गमविले. दिल्लीचे अर्धशतक 28 चेंडूत, शतक 75 चेंडूत तर दिडशतक 121 चेंडूत फलकावर लागले. कोलकाता संघातर्फे चक्रवर्तीने तीन तर अरोरा व हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2, तर स्टार्क व सुनील नरेन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
सॉल्टची फटकेबाजी
प्रत्युत्तरादाखल खेळताना सॉल्ट आणि सुनील नरेन या सलमीच्या जोडीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 79 धावा झोडपल्या. या जोडीने अर्धशतकी भागीदारी 27 चेंडूत नोंदविली. सॉल्टने 26 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. सॉल्ट आणि सुनील नरेन या सलामीच्या जोडीने पहिल्या षटकात 25 धावा घेतल्या. अक्षर पटेलने सुनील नरेनला झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 3 चौकारासह 15 धावा जमविल्या. कोलकाता संघाच्या या सलामीच्या जोडीने 37 चेंडूत 79 धावांची भागीदारी केली. सुनील नरेन बाद झाल्यानंतर सलामीचा सॉल्ट अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 33 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांसह 68 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला रिंकू सिंग विल्यम्सच्या गोलंदाजीवर यादवकरवी झेलबाद झाला. त्याने 11 चेंडूत 1 षटकारासह 11 धावा जमविल्या. कोलकाता संघाची स्थिती यावेळी 9.2 षटकात 3 बाद 100 अशी होती. कर्णधार श्रेयस अय्यर व व्यंकटेश अय्यर या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 57 धावांची भागीदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कर्णधार अय्यरने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 33, तर व्यंकटेश अय्यरने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 26 धावा जमविल्या. कोलकाता संघाला अवांतर 4 धावा मिळाल्या. केकेआरच्या डावामध्ये 7 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले.
कोलकात्ता संघाने पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकात 79 धावा झोडपल्या. केकेआरचे अर्धशतक 27 चेंडूत, शतक 55 चेंडूत तर दीडशतक 97 चेंडूत फलकावर लागले. श्रेयस आणि व्यंकटेश यानी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 43 चेंडूत झळकविली. दिल्ली संघातर्फे अक्षर पटेलने 2 तर विल्यम्सने 1 गडीबाद केला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 9 बाद 153 (कुलदीप यादव नाबाद 35, पंत 27, पोरेल 18, अक्षर पटेल 15, शॉ 13, मॅकगर्क 12, अवांतर 13, वरूण चक्रवर्ती 3-16, अरोरा 2-29, हर्षित राणा 2-28, स्टार्क 1-43, सुनील नरेन 1-24), कोलकाता नाईट रायडर्स 16.3 षटकात 3 बाद 157 (सॉल्ट 68, सुनील नरेन 15, रिंकू सिंग 11, श्रेयस अय्यर नाबाद 33, व्यंकटेश अय्यर नाबाद 26, अवांतर 4, अक्षर पटेल 2-25, विल्यम्स 1-38).