ईडन गार्डनवर केकेआरचे वर्चस्व
होमग्राऊंडवर लखनौवर 8 गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर फिल सॉल्टची 89 धावांची तुफानी खेळी
वृत्तसंस्था/ कोलकाता
येथील ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात केकेआरने लखनौ सुपर जायंट्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या आणि कोलकातासमोर 162 धावांचे आव्हान ठेवले. लखनौने दिलेले 162 धावांचे आव्हान कोलकाताने 15.4 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले. कोलकाताकडून फिल सॉल्टने 89 धावांची सर्वोच्च खेळी केली. विशेष म्हणजे, आयपीएल इतिहासातील केकेआरचा लखनौविरुद्ध पहिला विजय आहे. याआधी झालेल्या तीन सामन्यात लखनौने कोलकातावर विजय मिळवला होता. दरम्यान, केकेआरचा हा पाच सामन्यातील चौथा विजय असून गुणतालिकेत आठ गुणासह ते दुसऱ्या स्थानी आहेत. लखनौचा संघ पराभवानंतर पाचव्या स्थानी घसरला आहे.
लखनौने विजयासाठी दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील नरेनला (6 धावा) दुसऱ्याच षटकात मोहसीन खानने बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. यानंतर पुढील षटकात मोहसीनने रघुवंशीला देखील बाद करत लखनौला मोठे यश मिळवून दिले. लागोपाठ दोन धक्के बसल्यानंतर फिल सॉल्ट व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी करत संघाला 16 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. सलामीवीर फिल सॉल्ट केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. सॉल्टने 47 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने सॉल्टला चांगली साथ दिली. श्रेयसने नाबाद 38 धावा केल्या, ज्यात सहा चौकारांचा समावेश होता. लखनौकडून मोहसिन खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मोहसिन खानने 29 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत धाडले.
तत्पूर्वी, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी आलेल्या लखनौची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक तिसऱ्याच (10 धावा) षटकात स्वस्तात बाद झाला. यानंतर केएल राहुलने डाव सावरला. केएल राहुलने 39 धावा (27 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार) आणि आयुष बडोनीने 29 धावांचे (27 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) योगदान दिले. इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने लखनौला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. अखेरच्या काही षटकांत निकोलस पूरनने फटकेबाजी केल्यामुळे लखनौला 20 षटकांत 7 बाद 161 धावापर्यंत मजल मारता आली. पूरनने सर्वाधिक 32 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारासह 45 धावा केल्या. केकेआरकडून मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करताना 28 धावांत 3 गडी बाद केले. सुनील नारायण, वैभव अरोरा, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक : लखनौ 20 षटकांत 7 बाद 161 (डिकॉक 10, केएल राहुल 39, आयुष बडोनी 29, मार्क स्टोनिस 10, निकोलस पूरन 45, मिचेल स्टार्क 28 धावांत 3 बळी, नरेन, चक्रवर्ती, रसेल प्रत्येकी एक बळी).
केकेआर 15.4 षटकांत 2 बाद 162 (फिल सॉल्ट 47 चेंडूत नाबाद 89, नरेन 6, श्रेयस अय्यर नाबाद 38, मोहसीन खान 29 धावांत 2 बळी).
लखनौने जर्सीचा रंग का बदलला?
ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात लखनौचा संघ हिरव्या रंगाची छटा असलेली मरून रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. लखनौची नियमित जर्सी गडद निळ्या रंगाची आहे. परंतु, रविवारी लखनौने मरून रंगाची जर्सी घातली होती. ही जर्सी लखनौने बंगालमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब मोहन बागानच्या सन्मानार्थ घातली होती. मोहन बागान सुपर जायंट्स या क्लबची आणि लखनौ सुपर जायंट्स संघाची मालकी आरपी संजीव गोयंका ग्रुपकडे आहे. या क्लबच्या सन्मानार्थ आयपीएल 2023 मध्येही लखनौने केकेआरविरुद्ध कोलकातामध्ये खेळताना मरून रंगाची जर्सी परिधान केली होती.