For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेरच्या चेंडूवर केकेआरचा आरसीबीवर विजय

06:58 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेरच्या चेंडूवर केकेआरचा आरसीबीवर विजय
Advertisement

अवघ्या एका धावेने आरसीबी पराभूत, पराभवाचा आरसीबीचा ट्रेंड कायम :  केकेआरची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

येथील ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चँलेजर्स बेंगळूरवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 6 बाद 222 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव 221 धावांवर संपुष्टात आला. विजयासाठी अखेरच्या बॉलवर तीन धावांची गरज असताना आरसीबीला केवळ एक रन काढता आली. या विजयासह केकेआरचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आला आहे तर आरसीबीची पराभवाची मालिका कायम राहिली. दरम्यान, नाबाद 27 धावा व 25 धावांत 3 बळी घेणाऱ्या केकेआरच्या आंद्रे रसेलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 222 धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये आरसीबीने 27 धावा केल्या होत्या. यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विराट बाद झाला. यावेळी विराटच्या विकेटवरुन जोरदार वादंग पाहायला मिळाला. यानंतर फाफ डु प्लेसिस (7 धावा) देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.

आरसीबीचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदारने संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी साकारली. जॅक्सने 32 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह 55 तर रजत पाटीदारने 23 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारासह 52 धावा केल्या. दरम्यान, आंद्रे रसेलने जॅक्स आणि रजत पाटीदारला एकाच ओव्हरमध्ये बाद केलं. यानंतर आरसीबीकडून फलंदाजीला आलेले कॅमरुन ग्रीन आणि लोमोर स्वस्तात बाद झाले. प्रभुदेसाईने 24 धावा करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं 25 धावा करुन आरसीबीला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कर्ण शर्माने 7 बॉलमध्ये 20 धावा करत सामना रंगतदार स्थितीत पोहोचवला. पण मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. यानंतर आरसीबीचा डाव 221 धावांवर संपला.

फिल सॉल्टची फटकेबाजी

प्रारंभी, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल सॉल्ट आणि सुनील नरेन या जोडीने केकेआरच्या डावाची सुरुवात केली. यापूर्वीच्या मॅचमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या सुनील नरेनची बॅट आज तळपली नाही. दुसऱ्या बाजूला फिल सॉल्टने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 14 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारासह 48 धावा केल्या. पाचव्या षटकात सिक्स मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला बाद केलं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 26 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. यात सर्वाधिक धावा सॉल्टने तुफानी फलंदाजी करताना केल्या. सॉल्टने लॉकी फर्ग्युसनच्या एकाच षटकातून 28 धावा केल्या, मात्र मोहम्मद सिराजने सॉल्टला बाद करून अर्धशतक झळकावण्यापासून रोखले. यानंतर लागोपाठ तीन गडी बाद झाल्याने केकेआरची 4 बाद 97 अशी स्थिती झाली होती. सुनील नरेन 10, अंगक्रिष रघुवंशी 3 आणि वेंकटेश अय्यर 16 धावा करुन माघारी परतला.

श्रेयसचे अर्धशतक, रमणदीपची फटकेबाजी

कर्णधार श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले, पण अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने विकेटही गमावली. श्रेयसने 36 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 50 धावांचे योगदान दिले. त्याला रिंकू सिंगने 24 धावा करत चांगली साथ दिली. शेवटी, रमणदीप सिंगच्या वेगवान खेळीमुळे केकेआरने 20 षटकांत 6 बाद 222 धावांचा डोंगर उभा केला. रमणदीपने अवघ्या 9 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 24 धावा केल्या. आंद्रे रसेलने दुसऱ्या टोकाकडून रमणदीपला चांगली साथ दिली आणि रसेल 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.

संक्षिप्त धावफलक : केकेआर 20 षटकांत 6 बाद 222 (फिल सॉल्ट 48, श्रेयस अय्यर 50, रिंकू सिंग 24, रमणदीप सिंग नाबाद 24, रसेल नाबाद 27, कॅमरुन ग्रीन व यश दयाल प्रत्येकी दोन बळी).

आरसीबी 20 षटकांत सर्वबाद 221 (विल जॅक्स 55, रजत पाटीदार 52, दिनेश कार्तिक 25, कर्ण शर्मा 20, आंद्रे रसेल 3 तर हर्षित राणा व सुनील नरेन प्रत्येकी दोन बळी).

विराटच्या विकेटवरुन तुफान राडा

केकेआरविरुद्ध सामन्यात तिसऱ्या षटकात विराट कोहली बाद झाला, ज्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. केकेआरसाठी तिसऱ्या षटकात हर्षित राणा गोलंदाजीला आला, त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फुल टॉस बॉल टाकला, ज्यावर कोहलीनं बॅटनं बचाव केला. मात्र चेंडू हवेत उसळला आणि राणाने त्याचा झेल घेतला. झेल घेतल्यानंतर कोहलीने लगेचच डीआरएसची मागणी केली. मात्र थर्ड अंपायरनेही फिल्ड अंपायरचा निर्णय योग्य ठरवला आणि विराट बाद असल्याचे सांगितले. विराटला थर्ड अंपायरकडून नाबादचा निर्णय अपेक्षित होता. विराट जरी क्रीझमधून बाहेर येऊन हा शॉट खेळला असला तरी  तो टाचेवर उभा राहून खेळला. त्यामुळे विराटच्या उंचीत वाढ झाली होती. मात्र हर्षीतने टाकलेला बॉल कंबरेवर होता. त्यामुळे आऊट न देता नो बॉल असायला पाहिजे होता, असं विराटचं मत होतं. मात्र विराटच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे विराटने थेट अंपायरशीच वाद घातला.

Advertisement
Tags :

.