‘केकेआर’ची गाठ आज गुजरातशी
वृत्तसंस्था/ कोलकाता
आयपीएलच्या आज सोमवारी होणाऱ्या सामन्यात विद्यमान विजेता कोलकाता नाईट रायडर्सची गाठ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आणि फॉर्ममध्ये असलेल्या गुजरात टायटन्सशी पडणार असून यावेळी आपला संघर्ष करणारा फलंदाजी विभाग शेवटी सुरात येऊन आपला प्रभाव दाखवेल, अशी आशा केकेआर बाळगून असेल. नाईट रायडर्सना त्यांच्या मागील सामन्यात पंजाब किंग्सविऊद्ध 112 धावांचा पाठलाग करताना 95 धावांतच बाद व्हावे लागले आणि ही घसरण त्यांच्या फलंदाजांच्या एकूणच अपयशाचे प्रतिबिंब आहे.
परंतु भारतीय संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदावरून हटविलेले अभिषेक नायर हे परत गोटात दाखल होणे केकेआरला निश्चितच प्रोत्साहन देऊन जाईल. नायर हे यापूर्वी त्यांचे साहाय्यक प्रशिक्षक राहिलेले आहेत. केकेआरचे सध्या सात सामन्यांत सहा गुण झाले आहेत आणि प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना उर्वरित सात सामन्यांपैकी किमान पाच जिंकावे लागतील. अभिषेक नायरने उपकर्णधार व्यंकटेश अय्यर आणि रमणदीप सिंगसारख्या प्रमुख फलंदाजांसोबत काम करायला सुऊवात केली आहे. या हंगामात हे त्यांचे दोन कमकुवत दुवे राहिले आहेत.
याशिवाय आंद्रे रसेल, रिंकू सिंग यांनाही फारशी चमक दाखवता आलेली नसून फक्त रहाणे आणि तऊण अंगक्रिश रघुवंशी यांनी आशादायक कामगिरी केली आहे. वरच्या फळीत क्विंटन डी कॉक आणि सुनील नारायण यांनी काही वेळा चांगली सुऊवात केलेली असली, तरी ते नियमित कामगिरी करू शकलेले नाहीत आणि नायर यावर उपाय शोधतील, अशी केकेआरला आशा असेल.
दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टायटन्सने या हंगामात फक्त दोनदा पराभव पत्करला आहे. त्यांची गोलंदाजी हे एक मोठे बलस्थान राहिले आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सात सामन्यांत 14 बळी, तर डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोरने 11 बळी घेतले आहेत. साई किशोर ईडनच्या खेळपट्टीचा फायदा घेऊ शकतो. मोहम्मद सिराजचाही या हंगामातील बळी घेणाऱ्या आघाडीच्या दहा गोलंदाजांमध्ये समावेश आहे. फलंदाजी विभागात सलामीवीर बी. साई सुदर्शन (365 धावा) ऑरेंज कॅपधारक निकोलस पूरनपेक्षा फक्त तीन धावांनी मागे आहे, तर जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर मजबूत आहे. तळाकडे शेरफेन रदरफोर्ड त्यांचा जोरदार फटकेबाज म्हणून उदयाला आला आहे.
संघ :
कोलकाता नाईट रायडर्स- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लुवनीथ सिसोदिया, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती आणि चेतन साकरिया.
गुजरात टायटन्स- शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, बी. साई सुदर्शन, शाहऊख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, रशिद खान, कागिसो रबाडा, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अर्शद खान, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रार आणि करीम जनात.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.