For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केकेआर तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन

06:58 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
केकेआर तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन
Advertisement

अंतिम लढतीत हैदराबादचा लाजिरवाणा पराभव : वेंकटेश अय्यरचे नाबाद अर्धशतक तर सामनावीर स्टार्कचे 2, रसेलचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात केकआरने हैदराबादचा सहज पराभव करत तब्बल दशकभरानंतर आयपीएलचे जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा डाव 113 धावांत आटोपला. यानंतर विजयासाठीचे माफक आव्हान केकेआरने अवघ्या 10.3 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.  विशेष म्हणजे, केकेआरने 10 वर्षांनंतर पुन्हा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. केकेआरचे हे तिसरे आयपीएल जेतेपद असून गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती.

Advertisement

हैदराबादने दिलेल्या 114 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा सलामीवीर सुनील नरेन 6 धावा काढून बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला दुसऱ्याच षटकात तंबूत धाडले. यानंतर गुरबाज आणि वेंकटेश अय्यर यांनी 45 चेंडूमध्ये 91 धावांची शानदार भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. गुरबाजने 32 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 2 षटकार आणि पाच चौकार ठोकले. शाहबाद अहमदने गुरबाजला बाद केले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेरीस श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

वेंकटेश अय्यरचे नाबाद अर्धशतक

वेंकटेश अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अय्यरने 26 चेंडूमध्ये नाबाद 52 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये तीन षटकार आणि चार चौकार लगावले. श्रेयस अय्यर सहा धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

हैदराबादचे स्टार अंतिम सामन्यात फ्लॉप

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण केकआरच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादची दाणादाण उडाली. मिचेल स्टार्क आणि वैभव अरोराच्या माऱ्यापुढे पॉवरप्लेमध्येच हैदराबादचे तीन फलंदाज तंबूत परतले. पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कच्या जादुई चेंडूने अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केले. अभिषेक फक्त दोन धावा काढून बाद झाला. आयपीएलमध्ये दमदार फॉर्ममध्ये असलेल्या ट्रेव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. अरोराने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. राहुल त्रिपाठीलाही मोठी खेळी करता आली नाही. त्रिपाठी फक्त नऊ धावा काढून बाद झाला, त्याला फक्त एक चौकार ठोकता आला.

आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर एडन मॅरक्रम आणि नितीश कुमार रे•ाr यांनी संघर्ष केला. त्यांना चांगली सुरुवातही मिळाली, पण मोठी खेळी करता आली नाही. मॅरक्रमचा अडथळा रसेलने दूर केला. त्याने 23 चेंडूत 3 चौकारासह 20 धावा केल्या तर नीतीश कुमार रे•ाrने 13 धावांची खेळी केली. रे•ाr बाद झाला, यावेळी हैदराबादची 6 बाद 71 अशी स्थिती होती. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर शाहबाज अहमद आणि अब्दुल समद यांच्यावर मोठी जबाबदारी होती, पण हे दोघेही अंतिम सामन्यात अपयशी ठरले. शाहबाजने 17 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 8 धावा केल्या. अब्दुल समदला इम्पॅक्ट पाडता आला नाही, तो फक्त चार धावा काढून बाद झाला. आंद्रे रसेलने अब्दुल समदला बाद करत कोलकात्याला मोठं यश मिळवून दिले. विकेटकीपर फलंदाज हेनरिक क्लासेन हैदराबादचा डाव सावरेल असे वाटले होते, पण हर्षित राणाने त्याला तंबूत पाठवले. क्लासेनला फक्त 16 धावा काढता आल्या. पॅट कमिन्सने मात्र एकाकी झुंज देताना 19 चेंडूत 24 धावांची खेळी करत संघाला शतकी मजल मारुन दिली. कमिन्सला रसेलने बाद करत हैदराबाद डाव संपुष्टात आणला. हैदराबादचा डाव अवघ्या 18.3 षटकांत 113 धावांवर आटोपला.

केकआरकडून आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी करताना 19 धावांत 3 गडी बाद केले. मिचेल स्टार्क व हर्षित राणाने प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती व सुनील नरेन यांनी एकेक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : सनरायजर्स हैदराबाद 18.3 षटकांत सर्वबाद 113 (ट्रेव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 2, मॅरक्रम 20, नितिश कुमार रे•ाr 13, हेन्रिक क्लासेन 16, पॅट कमिन्स 19 चेंडूत 24, आंद्रे रसेल 3 बळी, मिचेल स्टार्क व हर्षित राणा प्रत्येकी दोन बळी).

केकेआर 10.3 षटकांत 2 बाद 114 (रेहमानउल्लाह गुरबाज 32 चेंडूत 39, सुनील नरेन 6, वेंकटेश अय्यर 26 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह नाबाद 52, श्रेयस अय्यर नाबाद 6, पॅट कमिन्स व शाहबाज अहमद प्रत्येकी एक बळी).

दशकानंतर जेतेपद

रविवारी झालेल्या मेगा फायनलमध्ये केकेआरने हैदराबादला नमवत तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले. याआधी केकेआरने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून आणि 2014 मध्ये पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव करून आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 2014 नंतर केकेआरचा संघ 2021 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, पण विजेतेपदाच्या लढतीत चेन्नईकडून 27 धावांनी पराभूत झाला. अखेर केकेआरला 10 वर्षांनंतर तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे.

विराट कोहली ऑरेंज कॅपचा तर हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी

यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. विराटने या हंगामात 15 सामन्यात 1 शतक, 5 अर्धशतकासह 741 धावा केल्या. आयपीएलमध्ये विराट दुसऱ्यांदा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. याआधी त्याने 2016 ऑरेंज कॅप पटकावली होती. आयपीएलच्या या हंगामातला पर्पल कॅप विजेता हर्षल पटेल ठरला. त्याने या हंगामात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना 14 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेत ऑरेंज कॅप मिळवली.

हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनला अश्रू अनावर

केकेआरने अंतिम सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव करुन आयपीएल चषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. संपूर्ण हंगामात दिमाखदार कामगिरी करणारे हैदराबादचे खेळाडू अंतिम सामन्यात मात्र, सपशेल अपयशी ठरले. दरम्यान, फायनलमध्ये हैदराबादचा पराभव झाल्यानंतर सनरायजर्सची सीईओ काव्या मारनला अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, पराभवानंतरही काव्या हिने पराभवाचे शल्य बाजूला ठेवत संघाच्या हंगामातील आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक केले.

Advertisement
Tags :

.