पालकमंत्र्यांच्या हस्ते कित्तूर उत्सवाला प्रारंभ
कलापथकांचा आविष्कार : देवदेवतांची वेशभूषा, सरकारी योजनांविषयी जागृती
बेळगाव : आकर्षक कलापथकांच्या कलाविष्काराने कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कित्तूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीला शोभा आली. मिरवणुकीला चालना देऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वीरज्योतीचे स्वागत केले. यंदा राणी चन्नम्मांचा 200 वा विजयोत्सव असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते कित्तूरच्या प्रवेशद्वारावर असलेल्या राणी चन्नम्मा, आमटूर बाळाप्पा व संगोळ्ळी रायण्णांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आकर्षक जानपद कलावाहिनीला चालना देण्यात आली. राणी चन्नम्मा चौकापासून निच्चणगी मठापर्यंत कलापथकांनी आपली कला सादर केली.
महिलांचे ढोलपथक, गारुडी बाहुली, ढोलपथक, नंदीध्वज, जग्गलगीसह विविध कलापथकांनी या मिरवणुकीत भाग घेतला होता. शंकराच्या वेशभूषेतील कलाकार लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत विविध शासकीय खात्यांच्या चित्ररथांनीही सहभाग दर्शवला होता. सरकारच्या विविध योजनांविषयी मिरवणुकीत जागृती करण्यात आली. फल-पुष्प प्रदर्शन व वस्तू प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी, राजगुरु संस्थान कलमठचे श्री मडिवाळ राजयोगिंद्र स्वामीजी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बैलहोंगलच्या प्रांताधिकारी प्रभावती फकिरपूर, कन्नड व संस्कृती खात्याचे सहसंचालक के. एच. चन्नूर, उपसंचालक विद्यावती बजंत्री आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कित्तूर परिसरातील नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.