कित्तूर उत्सवाच्या कार्यक्रमांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी कित्तूर उत्सवाची सांगता झाली. यासाठी मुख्यमंत्री विशेष विमानाने हुबळीला येऊन तेथून कित्तूरला पोहोचले. कित्तूरच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या राणी चन्नम्मांचा अश्वारुढ पुतळा तसेच संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यंदा राणी चन्नम्मांच्या विजयोत्सवाचे 200 वे वर्ष असल्यामुळे सरकारने कित्तूर उत्सवासाठी 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. बुधवार दि. 23 पासून शुक्रवारी 25 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस हा उत्सव चालला. शेवटच्या दिवशी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. कुस्ती शौकिनांच्या अलोट गर्दीत कुस्त्या झाल्या.
समारोप समारंभात कित्तूर कलमठचे श्री मडिवाळ राजयोगिंद्र स्वामीजी, निच्चणकी गुरु मडिवाळेश्वर मठाचे पंचाक्षरी स्वामीजी, कुडलसंगम पंचमसाठी जगद्गुरू श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी, कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी, विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार राजू कागे, विश्वास वैद्य, राजू सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह अनेक आजी-माजी नेते उपस्थित होते. समारोप समारंभात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारीही सहभागी झाले होते. कित्तूर उत्सवात सहभागी झाल्यास सत्ता जाणार, अशी समजूत आजवर पसरविण्यात आली होती. या समजुतीला फाटा देत उत्सवाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आहे.