कित्तूर उत्सवाचे थाटात उद्घाटन
विजय ज्योतीचे स्वागत; कलापथकाची मिरवणूक
बेळगाव : राणी चन्नम्माने ब्रिटिशांविऊद्ध लढून विजय संपादन केल्याची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या कित्तूर उत्सवाला गुऊवारी (दि. 23) सुरुवात झाली. चन्नम्मांच्या विजयाचे द्योतक म्हणून राज्यभरातून संचार करीत असलेल्या विजयज्योतीचे पालकमंत्र्यांनी कित्तूर चन्नम्मा चौकात स्वागत केले. त्यानंतर, त्यांच्याच हस्ते कित्तूर संस्थानचे ध्वजारोहण झाले. यावेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, आमदार आसिफ (राजू) सेठ, कलमठ माडिवाळ राजयोगींद्र स्वामी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद उपस्थित हेते. तत्पूर्वी, गडादमर्डी येथे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते ध्वजारोहणाने कित्तूर उत्सवाचे उद्घाटन झाले. उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लोकसाहित्य कलापथकाच्या मिरवणुकीचे उद्घाटन महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले. ढोल वादन, ताशा वादन, नंदीध्वज, रणहालगी वादन, संबळ वादन यासारख्या वाद्यांचा कलापथकामध्ये समावेश होता.