कित्तूर उत्सव आजपासून
जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री-इतर मंत्री येण्याची शक्यता
बेळगाव : कित्तूर उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून बुधवार दि. 23 ऑक्टोबरपासून तीन दिवस हा उत्सव होणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कित्तूरला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. 23 ते 25 ऑक्टोबरपर्यंत कित्तूर येथे तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री येण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राज्य, व राष्ट्रीय पातळीवरील कलाकार कित्तूरला येणार आहेत. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्य व्यासपीठ, आसन व्यवस्था, मीडिया सेंटर आदी तयारी पूर्ण झाली आहे. मिरवणूक मार्गाचीही पाहणी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या उत्सवात भाग घेऊन उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना आदी उपस्थित होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राणी चन्नम्माजींच्या पुतळ्यापासून मिरवणूक मार्ग व किल्ल्यापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.