सर्पदंश झाल्यानंतर विषाचे प्रमाण ओळखणारे किट विकसित
बेंगळूर : सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागाबरोबर शहरातही घडत असतात. सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत. सर्पदंशावेळी शरीरात किती प्रमाणात विष पसरले आहे याचा दोन मिनिटातच तपास करण्याचे किट तयार करण्यात आले असून ते लवकरच उपलब्ध होणार आहे. बेंगळुरात वास्तव्यास असलेले एडनूर (जि. कासरगोड) येथील डॉ. शाम भट यांनी या मेडिकल किटचा शोध लावला आहे. ‘स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट’ या नावाने ते विकसित करण्यात आले असून भारत सरकारकडून त्याला पेटंटही मिळाले आहे. प्रेग्नन्सी टेस्ट किट प्रमाणेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या रक्ताचे दोन थेंब या किटवर टाकल्यास दोनच मिनिटात सर्पदंश केलेला सर्प विषारी होता की बिनविषारा, हे समजून येणार आहे. तसेच शरीरामध्ये विष किती प्रमाणात भिनले आहे हे समजून येणार असल्याने संबंधिताला औषधाची मात्रा किती द्यावी हेही स्पष्ट होणार आहे. विषारी सर्पाने दंश केल्यास केवळ दहा मिनिटात विष संपूर्ण शरीरामध्ये पसरते. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता किटचा वापर करून माहिती करून घ्यावी. त्यानंतर रुग्णालयाकडे धाव घ्यावी. विषाचे प्रमाण ओळखण्याचे साधन अद्याप जगात कोठेही विकसित झालेले नाही. डॉ. भट यांनी प्रथमच या वैद्यकीय साधनाचा शोध लावला आहे. अद्याप ते बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेले नाही.