अमेरिकेत फैलावतोय ’किसिंग बग’ आजार
सीडीसीकडून इशारा
अमेरिकेत एक धोकादायक आजार वेगाने फैलावत असून याला चागस रोग किंवा किसिंग बग डिसिज म्हटले जाते. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) हा आजार अमेरिकेतील 32 प्रांतांमध्ये फैलावला असून लाखो लोक याने संक्रमित होऊ शकतात असा इशारा दिला आहे. हा रोग ट्रायटोमाइन किड्याने चावा घेतल्याने फैलावतो, यालाच किसिंग बग म्हटले जाते.
चागस रोग काय आहे?
चागरस रोग एक परजीवी म्हणजेच पॅरासाइटमुळे होणारा आजार आहे, जो किसिंग बग नावाच्या किड्याच्या मलाद्वारे माणूस आणि प्राण्यांमध्ये फैलावतो. या किड्याला ‘किसिंग बग’ म्हटले जाते, कारण हा बहुतांशवेळा चेहरा, खासकरून ओठ आणि डोळ्यांनजीक चावा घेतो. हा किडा रात्री सक्रीय होत रक्त शोषत असतो. चावल्यावर तो स्वत:च्या मलाला त्वचेवर सोडतो. जर हे मल डोळे, तोंड किंवा एखाद्या घातात पोहोचल्यास पॅरासाइट शरीरात प्रवेश करतो. सीडीसीनुसार जगभरात सुमारे 80 लाख लोक या आजाराने पीडित आहेत. बहुतांश दक्षिण अमेरिकेत, परंतु हा आजार आता अमेरिकेतही फैलावत आहे. अमेरिकेत 2.8 ते 3 लाख लोक या आजाराने संक्रमित होऊ शकतात, बहुतांशांना याची माहितीच नाही.
अमेरिकेत फैलाव
सीडीसीचा 2025 चा रिपोर्ट इमर्जिंग इन्फेक्शियस डिसिज मॅगजीनमध्ये प्रकाशित झाला. किसिंग बग अमेरिकेच्या 32 प्रांतांमये आढळून आला असून यात टेक्सास, कॅलिफोर्निया, एरिझोना, टेनेसी, लुइसियाना, मिसौरी, मिसिसिपी, अरकंसास सामील आहे. यातील 8 प्रांतांमध्ये माणसांमध्ये स्थानिक स्तरावर हा आजार आढळल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. खूप उशीर होत नाही तोवर बहुतांश लोकांना या आजाराची जाणीव होत नाही, कारण हा आजार अनेक वर्षांपर्यंत लक्षणाशिवाय राहू शकतो अशी माहिती डॉ. जूडिथ करियर यांनी दिली.
चागस रोगाची लक्षणे
चागस रोग दोन टप्प्यांमध्ये तीव्र (अॅक्यूट) आणि क्रोनिक (दीर्घ) होतो.
तीव्र टप्पा : हा टप्पा चावा घेतल्याच्या काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत राहू शकतो. यादरम्यान डोळ्यांच्या पापण्यांमध्ये सूज, ताप, थकवा, अंगदुखी, भूक न लागणे, उलटी, त्वचेवर फोड अशी लक्षणे दिसून येतात. तर अनेक लोकांमध्ये कुठलेच लक्षण दिसून येत नसल्याने आजाराचा शोध घेणे अवघड ठरते.
क्रोनिक टप्पा : हा टप्पा अनेक वर्षांपर्यंत चालतो, सुमारे 20-30 टक्के लोकांमध्ये गंभीर समस्या असू शकते. यात हृदयविकार, पचनतंत्रात समस्या, अचानक मृत्यू ही लक्षणे असतात, या टप्प्यात आजारावर उपचार अवघड ठरतो.