किरण ठाकुर यांचा आज ‘डी. लिट’ने सन्मान; टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पदवीदान सोहळा
पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 40 वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी पार पडणार असून, यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष व ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांना सन्माननीय डी.लिट (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता टिमविच्या मुकुंदनगर येथील संकुलात हा सोहळा होईल. या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक डॉ. नौशाद फोर्ब्स, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनाही डी.लिट (विद्यानिधी) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुऊ डॉ. गीताली टिळक यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति टिळक, सरिता साठे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या आधी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने अभय फिरोदिया, डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, ‘सीरम’चे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला, डॉ. अभय बंग, सुहास बहुलकर, उद्योगपती संजय किर्लोस्कर, टेहरी धरण प्रकल्पाचे शिल्पकार राजीवकुमार बिष्णोई, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांना सन्माननीय डी.लिट देऊन गौरविले आहे. पदवीप्रदान समारंभात 20 विद्यार्थ्यांना पीएच.डी., पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1046 विद्यार्थ्यांना, पदवी अभ्यासक्रमाच्या 1840 विद्यार्थ्यांना आणि कौशल्य विकास शाखेच्या 185 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल, असे कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी सांगितले. या समारंभात विविध शाखांमधील 22 विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक देऊन गौरव केला जाणार आहे.