किपगॉन, मेहुचिक यांचे नवे विश्वविक्रम
वृत्तसंस्था/पॅरिस
रविवारी येथे झालेल्या डायमंड लिग ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेत केनियाची महिला धावपटू फेथ किपगॉनने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा विश्वविक्रम केला. तसेच महिलांच्या उंच उडीमध्ये युक्रेनच्या येरोस्लेव्हा मेहुचिकने मागील विश्वविक्रम मोडीत काढला.
महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रविवारी केनियाच्या किपगॉनने 3 मिनीटे, 49.04 सेकंदांचा अवधी घेत नवा विश्वविक्रम रचताना गेल्या वर्षी इटलीमध्ये स्वत:चाच नोंदविलेला 3 मिनीटे 49.11 सेकंदाचा विक्रम मागे टाकला. महिलांच्या उंच उडीमध्ये युक्रेनच्या मेहुचिकने 2.10 मीटरचे अंतर नोंदवित या क्रीडा प्रकारात गेली 37 वर्षे अबाधित राहिलेला विक्रम मागे टाकला. 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत किपगॉन आणि मेहुचिक सुवर्ण पदकासाठी सज्ज झाल्या आहेत. 30 वर्षीय किपगॉनने 2016 च्या रिओ ऑलिंपिक तसेच 2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदकेमिळविली आहेत. आता ती या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची हॅट्ट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी किपगॉन आता 1500 मीटर आणि 5000 मीटर महिलांच्या धावण्याच्या शर्यतीत केनियाचे प्रतिनिधीत्व करेल.